पाण्यासाठी शेतकऱ्यांचा शिमगा; मुंडन करून नोंदविला निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिगवण

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणे भरून वाहू लागली असताना बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी गावाच्या पाणीपुरवठा योजनेसह परिसरातील गावांच्या शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मदनवाडी तलाव गेल्या अनेक महिन्यांपासून कोरडा पडल्याने गावांचा पाणी प्रश्न तीव्र झाला आहे. अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनदेखील तलावात पाणी सोडत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी राज्य शासन व जलसंपदा विभागाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले तसेच कार्यकर्त्यांनी मुंडण करुनही निषेध व्यक्त केला.

पुण्यासह भीमा नदीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने खडकवासला सह अनेक धरणे भरली आहेत मात्र तरीदेखील जलसंपदा विभागाच्यावतीने इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ते तरंगवाडी तलावात पाणी सोडले नाही. हे तलाव कोरडेठाक पडले आहेत. मदनवाडी तलावावरील परिसरातील हजारो एकरांवरील चारा पिकांसह इतर पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे खडकवासला कालव्यातून मदनवाडी तलावात प्राधान्याने पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली.

सन १९७२ साली बांधण्यात आलेला व सुमारे १७० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या मदनवाडी तलावात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर येते. त्याचप्रमाणे खडकवासला कालव्यातून येणारे पाणीदेखील तलावात सोडले जाते. यामुळे परिसराला वर्षभर पाणी पुरते. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा तलाव सध्या हा पाणी न सोडल्यामुळे कोरडा पडलेला आहे तर दुसरीकडे जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत.
त्यामुळे खडकवासला कालव्यातून मदनवाडी तलावात पाणी सोडण्याची मागणी मदनवाडी, सिद्धेश्वर निंबोडी गावांतील ग्रामस्थांच्या वतीने खडकवासला पाटबंधारे विभाग व तहसीलदारांना निवेदनद्वारे केली होती.

तरीदेखील यावर कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी मदनवाडी तलावात जमा होत उपोषण धरण्याचा मार्ग केला होता. त्यांनाही पाणी सोडण्याचे आश्वासन देत जलसंपदा विभागाच्यावतीने तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली मात्र बुधवारी पुन्हा शेतकरी आक्रमक होत मदनवाडी तलावात उतरले बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी काही शेतकऱ्यांनी तलावाच्या कोरड्या पात्रात जलसंपदाच्या धोरणाविरोधात मुंडन करून निषेध व्यक्त केला.

यावेळी रंगनाथ देवकाते, आबा बंडगर, कुंडलिक बंडगर, गणेश साळुंखे, गणपत ढवळे, राजेंद्र धुमाळ, सुरज बंडगर, संतोष सोनवणे, गुणवंत बंडगर, बबलू भोसले, पर्वती बंडगर, प्रशांत ढवळे, सुरेश देवकाते, संजय देवकाते उपस्थित होते.

तलावाच्या पाण्यावर शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅंकेकडून कर्जे घेतली आहे. पाणी नसल्याने पिके जळून गेल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य नाही त्यामुळे सरकारने याचा विचार करावा.
– आबा बंडगर,शेतकरी
एकीकडे भरपूर पाणी आहेत तर दुसरीकडे पाण्याची वाणवा असून जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या आंदोलनची दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करु.
– रंगनाथ देवकाते, माजी संचालक, कर्मयोगी कारखाना