
सामना ऑनलाईन । फर्दापूर
जळगाव महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात गुरुवार, सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास महाकाय दरड कोसळली. दरडीतील मोठे दगड व माती महामार्गावर येऊन पडल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरड कोसळली त्यावेळी तेथे कोणतेही वाहन नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळापासून काही फुटांच्या अंतरावर असलेली शिवशाही बस या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.’
फर्दापूर येथील संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात पावसाळ्यात दरवर्षी छोट्या-मोठ्या दरडी कोसळून वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याचे व महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचे प्रसंग नेहमीच होतात. तरी प्रशासनाने घाटातील धोकादायक दरडींना लोखंडी जाळ्या बसविण्याच्या किंवा घाटातील महामार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने इतर कोणतीही खबरदारी घेतली नाही.
दरड कोसळल्यानंतर अर्धा तास घाटातील महामार्ग बंद झाला होता. घटनेनंतर फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड, पो.कॉ.राजू काकडे, नारायण खोडे, मनीष गिरी, अण्णा गवळी, काझी, जिरी, मिलिंद मेढे आदींनी गाड्यांमधील प्रवासी व फर्दापूर येथील नागरिकांच्या सहकार्याने महामार्गावरील मोठमोठे दगड व माती बाजूला सारून घाटातील एकेरी महामार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, दुपारी बारा वाजेपर्यंत जेसीबीच्या साहाय्याने फर्दापूर पोलीस व कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कर्मचाNयांनी घाटातील महामार्गावरील दरड हटवून महामार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.






























































