
सामना ऑनलाईन । मुंबई
गेली अनेक वर्षे एकांकिका, हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक व निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या आनंद म्हसवेकर यांचे ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे २२ वे नवेकोरे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे, एक गंभीर विषय त्यांनी विनोदी पद्धतीने या नाटकात मांडला आहे. मुंबईत सलग सहा दिवस शुभारंभाचे प्रयोग गाजवून आता हे नाटक पुण्याला निघाले आहे.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १ सप्टेंबर रोजी; तर पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात २ सप्टेंबर रोजी या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे पुन्हा एकदा रंगभूमीवर आले असून, हे या नाटकाचे आगळे वैशिष्ट्य ठरले आहे.
‘प्रयोग फॅक्टरी’ निर्मित व ‘जिव्हाळा’ प्रकाशित या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. अनुराधा सामंत या नाटकाच्या निर्मात्या आहेत. संदेश बेंद्रे यांनी या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. मयुरेश माडगांवकर यांचे पार्श्वसंगीत; तर विनय आनंद यांची प्रकाशयोजना आहे. कार्यकारी निर्माता म्हणून विनय म्हसवेकर हे काम पाहात आहेत. अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, शर्वरी गायकवाड, देवेश काळे, संजय देशपांडे, सुचित ठाकूर व गीता शिंदे हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत.



























































