
सामना प्रतिनिधी । चिरनेर
देशातील 32 हजार बंदर व गोदी कामगार आणि 1 लाख 5 हजार निवृत्त कामगारांसाठी भरघोस वेतन वाढीचा करार केंद्रीय नौकानयन व रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. बंदर व गोदी कामगारांच्या पगारवाढी बाबत द्वीपक्षीय वेतन समितीची 10 वी बैठक मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एव्हलिंग हाऊस येथे गुरूवार दि. 30 रोजी झाली त्या बैठकीत हा नवीन वेतन करार करण्यात आला.
या वेतन करारानुसार कामगारांना 31 डिसेंबर 2016 च्या मुळ पगारामध्ये जानेवारी 2017 चा महागाई भत्ता विलिन करून सुधारित मुळ वेतनावर 10.6 टक्के येवढी पगारवाढ मिळणार आहे. या वेतन करारावर इंडियन पोर्ट असोशिएशन व मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय भाटीया, इंडियन पोर्ट असोशिएशनचे संचालक ए. जनार्दन राव, विभागीय केंद्रीय कामगार आयुक्त एन.एम. शेट्टी, इंडियन पोर्ट एण्ड डॉक मजदूर महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर उपरकर, कामगार नेते सुरेश पाटील, जेएनपीटी विश्वस्त रवी पाटील, एस.के. शेट्टे, महम्मद हनीफ, प्रभात सावंतर रॉय, टी नरेंद्र राव तर व्यवस्थापनाच्या वतीने जेएनपीटीचे प्रभारी चेअरमन निरज बन्सल, कोचिन पोर्टचे चेअरमन व्यंकटरमण अकार्जू, सरकारचे माजी सचिव पी.डी. शहनाय यांनी सह्या केल्या.






























































