शेजाऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बापानेच केली मुलीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भिवानी

शेजाऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एका बापाने चक्क आपल्या मुलीचीच हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याची घटना हरयाणामध्ये घडली आहे. पोटच्या मुलीकडून आत्महत्येची चिठ्ठी लिहून घेत तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुलीचे वडील शेर सिंह, मुलीचा भाऊ बिंटू आणि काही नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली  आहे.

हरयाणातील कितलाना गावात राहणारे शेर सिंह तसेच त्याचा मुलगा बिंटू आणि त्याचे नातेवाईक अनिल, घीसाराम, संजय यांनी शेजाऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एक कट रचला. त्याप्रमाणे 26 ऑगस्टच्या रात्री शेर सिंह आणि त्याचे नातेवाईक यांनी मिळून मुलीला एक आत्महत्येची चिठ्ठी लिहायला लावली. त्या चिठ्ठीमध्ये शेजारी राहणारा तरूण प्रदीप याने आपल्यावर बलात्कार केल्याचे लिहायला लावले आणि मुलीचा दोरीने गळा आवळून तिचा मृतदेह फासावर लटकवला.  तिच्यावर बलात्कार झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे त्यांनी भासवले आणि दुसऱ्या दिवशी मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांना कळवले. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. त्यात शेजारी राहणाऱ्या प्रदिप याने बलात्कार केल्याचे नमुद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी प्रदीपला अटक केली. परतु पोलिसांना मुलीचे वडील शेर सिंह आणि त्याच्या नातेवाईकांवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. पोलीसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.