तिसरी डेडलाइनही संपली… आता मुहूर्त कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन , अलिबाग

भाऊचा धक्का ते मांडवा रो रो बोटसेवेची तिसरी डेडलाइनही टळून गेली तरी ठेकेदार सापडत नसल्याने मेरीटाईम बोर्डाची मोठी गोची झाल्याचे उघडकीस आले आहे. रो रो बोटसेवा चालवण्यासाठी तीन वेळा निविदा काढूनही ठेकेदारांनी थंड प्रतिसाद दिल्यामुळे ही सागरी प्रवासी सेवेचा मुहूर्त महिनोंमहिने पुढे सरकत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून निदान गौरी-गणपती आधी रो रो बोटसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रो-रो सेवेबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यांवरील प्रवास नकोसा वाटतो. आपले स्वतःचे वाहन घेऊन गौरी-गणपतीच्या सणासाठी कुटुंबासह वेळेत पोहोचण्याची कसरत दरवर्षी करावी लागते. मुंबईपासून काही अंतरावर असतानाही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पहिल्या आरतीला पोहोचता आलेले नाही. रो रो बोटसेवेमुळे हे स्वप्न या वर्षी पूर्ण होईल, असे वाटत असतानाच ठेकेदारांनी खो घातल्यामुळे चाकरमान्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा ही बहुप्रतिक्षीत रो-रो सेवा पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याची घोषणा करण्यात आली होती. मांडवा येथील ब्रेकवॉटर सिस्टीम आणि जेट्टीचे काम जून महिन्यात पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा कक्षाची सजावट, पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 15 ऑगस्टला ही सेवा सुरू होईल, असा दावा मेरीटाईम बोर्डाने केला होता. त्यानंतर  जेएनपीटी येथील कार्यक्रमात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, अशी नव्याने घोषणा केली. मात्र रो रो बोटसेवा चालवण्यासाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याने सर्व यंत्रणा सज्ज असतानाही मेरीटाईम बोर्डाची बोट अजूनही धक्क्यालाच आहे.

मांडवा ते गेट वे जलवाहतूक आजपासून सुरू

रो-रो सेवेची प्रतीक्षा लांबली असली तरी मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतुकीला उद्या 1 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. समुद्र अद्याप अशांत असल्याने पीएनपी, मालदार, अजंठा या कंपन्यांनी प्रवासी सेवा सुरू केली नव्हती.  गणपती उत्सवापूर्वी ही सेवा सुरू होत असल्याने अलिबाग, मुरूडमधून मुंबईत सणाच्या खरेदीसाठी जाणे सुलभ होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील चाकरमान्यांना रस्त्यावरील दगदगीचा प्रवास टाळता येणार आहे.