नांदेडमध्ये गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडच्या इतवारा पोलिसांनी बंदी असलेल्या गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या इतवारा पोलिसांनी माळटेकडी रस्त्यावर हा कंटेनर जप्त केला असून त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

राज्यात गुटखाबंदी असूनही मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक आणि विक्री होत आहे. त्यामुळे चक्क कंटेनर भरून विक्रीसाठी चाललेला गुटखा पोलिसांच्या हाती लागला आहे. माळटेकडी रस्त्यावर पोलिसांना एक कंटेनर संशयास्पद आढळल्याने त्याच्या चालकाकडे विचारपूस केली, त्यावेळी चालक उडवा- उडवीची उत्तरे देऊ लागला. शेवटी पोलिसांनी कंटेनरचा दरवाजा उघडल्यावर त्यामध्ये गुटखा भरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर चालक मोहम्मद कलीम आलम (२३) याला ताब्यात घेऊन कंटेनर जप्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सदर घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली असून, पोलीस आणि एफडीएचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.