258 मंडळांच्या मंडपांना परवानगी नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विघ्नहर्त्यापुढे यंदाही मंडपांच्या परवानगीचे विघ्न कायम आहे. गणेशोत्सवाला अवघे 12 दिवस शिल्लक असून मुंबईतील थोडेथोडके नाही, तर तब्बल 258 मंडळांचे अर्ज विविध कारणांमुळे पालिका प्रशासनाने नाकारले आहेत. त्यामुळे या मंडळांपुढे आता गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत पालिकेकडे 2488 मंडळांचे अर्ज आले असून त्यापैकी 1958 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

रस्त्यावर मंडप उभारणाऱया गणेशोत्सव मंडळांना झटपट परवानगी देण्यासाठी यंदा पालिकेने ऑनलाइन परवानगी देण्याची पद्धत आणली. या पद्धतीअंतर्गत मंडळांना वेगाने परवानगी देण्याचे काम सुरू आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडप बांधलेला नसल्यामुळे तसेच अटींची पूर्तता केलेली नसल्यामुळे तब्बल 258 मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. मोठय़ा प्रमाणावर मंडळांना परवानगी दिलेली असली तरी परवानगी नाकारलेल्या मंडळांची संख्याही खूप मोठी आहे. परवानगीशिवाय या मंडळांनी मंडप उभारल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता या मंडळांचे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सव मंडळांना ‘कलम 317’ अन्वये पोलीस परवानगी देतात. रहदारीला अडथळा करणाऱया मंडळांना पोलीस आणि ट्रफिक पोलीस परवानगी देत नाहीत. अशा मंडळांना वॉर्ड कार्यालयातूनही परवानगी नाकारली जाते. यंदा अशा 258 मंडळांना विविध कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. मंडळांना अर्ज करण्यासाठी पालिकेने 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या मंडळांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्याने अर्ज केल्यास त्यांचा नव्याने विचार होऊ शकतो अशी माहिती अधिकाऱयानी दिली.

मंडळांमार्फत साथीच्या आजारांवरही जनजागृती
डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या आजारांच्या रुग्णांची आणि बळींची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने यंदा जनजागृतीसाठी गणेशोत्सव मंडळांची मदत घेण्याचे ठरवले आहे. यात प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी प्रबोधनात्मक पोस्टर्स लावणे, तसेच गणेशोत्सव मंडळांना प्रबोधनात्मक ध्वनिफिती व चित्रफितींचे वाटप करून त्यांचा गणेशोत्सव कालावधीत नियमित उपयोग करण्याची विनंती मंडळांना करावी, असेही निर्देश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

मंडळांची संख्या वाढली
यंदा पालिकेकडे एकूण 3186 अर्ज आले, मात्र काही मंडळांनी डबल अर्ज भरल्यामुळे तब्बल 698 अर्ज रद्द करण्यात आले तर उर्वरित 2488 अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 2200 अर्ज आले होते. त्यामुळे यावेळी रस्त्यावरच्या मंडळांची संख्या 288 नी वाढली आहे.

खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कारवाई
गणेशोत्सव कालावधीत गणेशदर्शनासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणावर फिरत असतात. त्यामुळे या काळात उघडय़ावरील अन्नपदार्थ, पेय पदार्थ, निकृष्ट दर्जाचा बर्फ यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱयांना दिले आहेत.

आलेले एकूण अर्ज- 3186

डबल अर्ज रद्द केले – 698

अर्जांचा विचार केला – 2488

परवानगी दिली – 1958

परवानगी नाकारली- 258

अर्ज निकाली काढणे बाकी – 272