मुंबई सेंट्रल स्थानकाचे ‘जगन्नाथ शंकरशेट टर्मिनस’ असे नामकरण करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांनी 1845 मध्ये जमशेदजी जीजीभॉय यांच्या सहकार्याने मुंबईत रेल्वे सुरू करण्यासाठी ‘हिंदुस्थान रेल्वे असोसिएशन’ची स्थापना केली होती. तसेच त्यांनी रेल्वेसाठी जमीन आणि आर्थिक संपत्ती दिली होती. त्याची दखल घेऊन सरकारने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे ‘जगन्नाथ शंकरशेट टर्मिनस’ असे नामकरण करावे, अशी मागणी आमदार मंगल प्रभात लोढा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

मुंबई दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामकरणाबाबतचे निवेदन दिले. तसेच नामकरणाबाबतचे जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे निवेदनही दिले. त्याचबरोबर नामकरणाबाबतची मागणी दीर्घकाळपासूनची असल्याचेही त्यांनी  गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार सकारात्मक निर्णय घेण्याचे अश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले. जगन्नाथ शंकरशेट हे मुंबईचे आद्य शिल्पकार असून शहराची रचना त्यांच्या संकल्पनेनुसारच झालेली आहे.  त्यामुळे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव दिल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही लोढा यांनी स्पष्ट केले.