ताडदेवमध्ये गोविंदा मटकवणार 4 लाख 44 हजार 444 रुपयांचे लोणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत सोमवारी गोविंदा ताडदेवमध्ये तब्बल चार लाख 44 हजार 444 रुपयांच्या रोख बक्षिसांचे लोणी मटकवणार आहेत. दहीहंडी उत्सव धूमधडाक्यात साजरा व्हावा, गोविंदा पथकांचा उत्साह वाढावा म्हणून शिवसेनेचे कोल्हापूर-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ‘ममता चषक- 2018’ भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्याने मुंबापुरीतील दहीहंडी मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचा हा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी अरुण दुधवडकर यांनी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासाठी खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच दहीहंडीच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोकगीते, कोळीगीते सादर केली जाणार आहेत. या उत्साहाच्या वातावरणात मुंबईतील नामवंत गोविंदा पथकांचा येथे थरथराट अनुभवता येणार आहे. या भव्य महोत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना 4 लाख 44 हजार 444 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे तर मानाचा आकर्षक ममता चषक आणि रोख बक्षीस सर्वात जास्त थर लावणाऱ्या पथकाला देण्यात येणार आहे. तरी या दहीहंडी महोत्सवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सुरक्षेच्या सर्व साधनांसह सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक अरुण दुधवडकर यांनी केले आहे.