
सामना ऑनलाईन । वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले तालुक्यातील आजगाव येथे गोवा अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि लाखो रुपयांचे चरस जप्त केला आहे. या कारवाईत बंदूक, जिवंत काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गोव्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं वेंगुर्ले तालुक्यातील आजगावमध्ये शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. आजगावातील एका घरात अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती गोव्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वेंगुर्ले पोलिसांना सोबत घेऊन त्या घरावर छापा टाकण्यात आला. गोवा आणि वेंगुर्ला पोलिसांच्या छाप्यात जवळपास सहा लाखांचे चरस आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आली. यामध्ये एक बंदूक, 6 जिवंत काडतुसे आणि 133 जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान,महाराष्ट्र आणि गोव्याच्या सिमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने घातपाताचा काही कट होता का, तसेच यामागे कोणती संघटना आहे का, याबाबत तपास पोलीस करत आहेत.



























































