मळगंगा मंदिरातील चोरीचा बारा तासांत छडा; पाच गुन्हेगार जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मंदिरातून दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने 12 तासांत छडा लावला आहे. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, दागिन्यांसह हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. अटक केलेल्यांमध्ये एका सराफ व्यावसायिकाचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आरोपींवर इतर जिह्यांमध्येही गंभीर गुन्हे असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.