देशीसोबत काजूचा चकणा चोरट्यांना महागात पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पैठण

देशीसोबत काजू-बदामाचा चकणा खाणे चोरट्यांना महागात पडले. १५ दिवसांपूर्वी शहरातील ७ दुकाने एकाच रात्रीत फोडून रोख रकमेसह काजू-बदामही चोरट्यांनी लंपास केले होते. देशी दारू पिताना काजु-बदामाचा चकणा खाणाऱ्या या मद्यपींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आणि या चोरीचा उलगडा झाला. पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांनी शिताफीने तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पैठण न्यायालयाने दोन्ही चोरट्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील एकाच रात्री ७ दुकाने फोडल्याप्रकरणी तालुक्यातील रहाटगाव येथील अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी गजाआड केले. या दोघांनी आपल्या साथीदारांसह दारूच्या नशेत दुकान फोडल्याचे कबूल केले आहे. अनिल अशोकराव फासाटे (२४), रमेश हरीभाऊ उबाळे (३४, दोघे राहणार रहाटगाव, तालुका पैठण), यांना अटक केली आहे. या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना तीन सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.

पैठणच्या मुख्य बाजारपेठेतील तब्बल ७ दुकाने १३ ऑगस्टच्या रात्री फोडण्यात आली होती. विशेष म्हणजे या भुरट्या चोरांनी दुकानांतील वस्तू ऐवजी केवळ चिल्लर अन् नोटा अशी एकूण १० हजार ४०० रुपयांची रोकड लांबवली होती. ५ बिअर व काजू-बदामसह एक सी.सी.टी.व्ही.सुद्धा चोरून नेल्याचेही आढळून आले होते. पैठण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करून कसून तपास सुरू केला होता. चोरी झालेल्या सर्व दुकानांचे पंचनामे करून अत्यंत बारकाईने तपासाला सुरुवात करण्यात आली होती.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री ७ दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती. विशेष म्हणजे तत्पूर्वी १३ ऑगस्ट, मध्यरात्री पैठण येथील खुले कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांच्या जय भवानीनगरातील फ्लॅटचे लॉक तोडून ८५ हजारांचे सोन्याचे दागिने पळविण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही दुकानफोडीचा प्रकार घडला होता.

काजू, बदाम काढले अन् फसले
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांनी सांगितले की, आठ दिवसांपूर्वी या आरोपींवर संशय होता. आम्ही त्यांच्या मागावर होतो. दोघे आरोपी त्याच्या मित्रांसोबत रहाटगाव येथे एका शेतात दारू पित असताना खिशातून चकणा म्हणून काजू, बदाम बाहेर काढले. ‘आम्ही मोठा डल्ला मारला, अशी फुशारकी मारली. याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावरून शनिवारी सकाळी या दोघांना अटक केली.