नांदेडमध्ये कोट्यवधींचा डांबर घोटाळा उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

सार्वजनिक बांधकाम विभागातील बारा अधिकाऱ्यांचे प्रकरण गाजत असतानाच आज २०१०-११ या वर्षात शासनाची फसवणूक करुन डांबर खरेदीची बोगस बिले सादर करून जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपयांचा शासनाला चुना लावल्याबद्दल आज साहाय्यक अभियंता संदीप अशोक कोटलवार यांच्या तक्रारीवरुन सहा कंत्राटदाराविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन यातील दोन कंत्राटदार भास्कर कोंडा आणि मनोज मोरे यांना अटक केली आहे.

नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील गेल्या पाच ते सहा वर्षातील वेगवेगळ्या सुरस कथा गाजत आहेत. २००८ ते २०११ या गुरुतागद्दी सोहळ्यात व त्यानंतर मजूर सोसायट्यांची मंजुरी नसताना कामे देणे, कामांचे तुकडे पाडून त्यांना मंजुरी घेणे, अवैधरित्या मंजूर न झालेली कामे तयार करुन बिले उचलणे, हा सारा प्रकार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बारा अधिकाऱ्यांना अद्यापही दिलासा मिळाला नाही. हे प्रकरण ताजे असतानाच काल रात्री शासनाच्या निर्देशानुसार २०१० ते २०११ या काळात शासनाने निर्देशित केलेल्या कंपन्यांकडून डांबर खरेदी न करता अन्य खासगी कंपन्यांकडून डांबर खरेदी करणे, सदरचे डांबर शासन निर्देशित केलेल्या कंपनीकडूनच खरेदी केले आहे म्हणून त्याच्या बोगस पावत्या लावणे, कागदोपत्री डांबराची खरेदी करुन शासनाची फसवणूक करणे, दिलेल्या निर्देशांचे पालन न करणे आणि शासनाच्या निधीचा अपव्यय करुन बोगस कामे करणे याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता व याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारीही झाल्या होत्या.

हे प्रकरण विधानसभेपर्यंत गाजल्यानंतर अखेर सहायक अभियंता संदीप अशोक कोटलवार यांच्या तक्रारीवरुन नांदेड जिल्ह्यातील सहा बड्या कंत्राटदारांविरुद्ध संगनमताने फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, शासनाच्या निधीचा अपव्यय करणे, या कलमांखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात निखिला कंन्स्ट्रक्शनचे भास्कर कोंडा, मोरे कंन्स्ट्रक्शनचे मनोज रावसाहेब मोरे (रावसाहेब मोरे हे माजी जि.प.अध्यक्ष आहेत, त्यांचे मनोज हे पुत्र आहेत), एस.जी.पद्मावार, सोनाई कंन्स्ट्रक्शनचे सतीश देशमुख, सी.एस.संत्रे कंन्स्ट्रक्शन, नुसरत कंन्स्ट्रक्शनस प्रो.प्रा.मोईज रा.करखेली यांचा समावेश आहे. यापैकी निखिला कंन्स्ट्रक्शनचे भास्कर कोंडा व मोरे कंन्स्ट्रक्शनचे मनोज मोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम.टी.सुरवसे यांनी दिली. मात्र हे होत असताना सहायक अभियंत्यांनी अनेक बड्या नावांना बगल दिली असून, त्यात शहरातील नामवंत कंत्राटदारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांनी यात संगनमत करून बिले काढली त्यांची नावे मात्र वगळण्यात आल्याने त्याची वेगळीच चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात होत आहे.

summary- tar scam at nanded pwd department