
सामना ऑनलाईन, मुंबई
महागाईचा भस्मासुर, प्रचंड बेकारी आणि करांचा वरवंटा विसरून आज मुंबई-ठाण्यासह राज्यभरात गोविंदांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली. ढोलताशांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उत्सवी वातावरणात लोणी मटकावण्यासाठी गोविंदांच्या पथकांनी थरावर थर रचले. कधी गोविंदांना हंडीची हुलकावणी तर कधी क्षणाक्षणाला कोसळणारे थर यामुळे उत्कंठा शिगेला पोहचली. ठाण्यात जोगेश्वरीच्या ‘जय जवान’ पथकाने नऊ थरांची सलामी देण्याचा मान पटकावला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर आज सकाळपासूनच गोविंदांची पथके लव्याजम्यासह मोहिमेवर निघाली. बक्षिसाच्या रकमेची तमा न बाळगता शिस्तबद्ध आणि नियमानुसार दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये महिला गोविंदा पथकांचा समावेशही लक्षणीय होता. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या वर्षीही 14 वर्षांखालील गोविंदांचा समावेश गोविंदा पथकांमध्ये करण्यात आला नाही. काही ठिकाणच्या तुरळक दुर्घटना वगळता अवघ्या महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला.
राज्यभरात दहीहंडी मोठय़ा उत्साहात साजरी होत असताना धारावीत मात्र एका 27 वर्षीय गोविंदाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. अंकुश खंदारे असे या दुर्दैवी गोविंदाचे नाव आहे. धारावीच्याच बाळ गोपाळ मित्र मंडळाचा गोविंदा असलेला अंकुश पहिल्या थरावर असताना चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
150 गोविंदा जखमी
दहीहंडी साजरी करताना 150 गोविंदा जखमी झाले. सरकारी रुग्णालये, पालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालयांतील आकडेवारीनुसार 79 गोविंदांना तत्काळ उपचार करून सोडून दिले, तर 70 गोविंदांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी शहर भागात शीव रुग्णालयात 8, केईएममध्ये 34, नायरमध्ये 7, रहेजा रुग्णालयात 1, पोदार रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज रुग्णालयात 1, पूर्व उपनगरातील अग्रवाल रुग्णालयात 2, राजावाडी रुग्णालयात 7, महात्मा फुले रुग्णालयात 1 तर पश्चिम उपनगरातील व्ही. एन. देसाई रुग्णालयात 4, वांद्रे भाभा रुग्णालयात 5, ट्रॉमा केअर रुग्णालयात 4 गोविंदा दाखल आहेत.
सैनिकहो तुमच्यासाठी!
दादरच्या खांडके बिल्डिंग येथे आयोजित दहीहंडी उत्सवात बाळगोपाळ मित्रमंडळाच्या गोविंदांनी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना सलामी दिली. मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांना उत्तर कश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आले होते.
ठाण्यात 13 गोविंदा जखमी
शहरात दहीहंडी उत्सवात विविध ठिकाणी थरावरून पडून एकूण 13 गोविंदा जखमी झाले. यातील गोविंदांना ठाणे जिल्हा सिव्हिल, कळवा येथील छत्रपती शिकाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काही गोविंदांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.




























































