माँसाहेबांचा उद्या स्मृतिदिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा 22 वा स्मृतिदिन गुरुवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्त मुंबई येथील स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्यावतीने गुरुवारी सकाळपासून शिवतीर्थावर माँसाहेबांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा स्मृतिदिन कार्यक्रम दोन सत्रांमध्ये होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणाऱया पहिल्या सत्रात ‘श्री सिद्धिविनायक सुगम संगीत’चे रविराज नर, राजा कदम, संजय परळकर, मनीषा कीर, चंद्रकांत साखरपेकर, प्रमोद परकर, सुहास जयवंत, विजय पवार, श्यामसुंदर परब आदी कलाकार भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करतील.

कार्यक्रमाच्या दुसऱया सत्रात ताडदेव येथील श्री गणेश महिला मंडळ, दादर येथील आर्यादुर्गा भजन मंडळ आणि दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ, सावंतवाडी संस्थान महिला भजन मंडळ या संस्थांच्या वतीने भजनगीतांचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली. खोपोली येथील रमाधाम येथेही माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.