
सामना ऑनलाईन । मुंबई
गोविंदांचे थरावर थर रचले जात असताना बेताल बडबड करून भाजपचे आमदार राम कदम यांनी अत्यंत खालचा थर गाठला. तुम्ही मला कोणत्याही कामासाठी भेटू शकता. जर तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज केलं आणि ती नाही म्हणाली तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार, अशी बेताल बडबड करून राम कदम यांनी अक्षरशः लाज आणली. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे.
गोपाळकाल्यानिमित्त सोमवारी घाटकोपरमध्ये आयोजित दहीहंडी उत्सवात राम कदम यांच्यातला रावण जागा झाला. गोविंदांसमोर फुशारकी दाखवण्याचा मोह राम कदमांना आवरता आला नाही. आपण काय करू शकतो हे दाखवण्याच्या नादात त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले, ‘कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. जर आईवडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करीन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा’. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरांतून जोरदार निषेध करण्यात आला. टीकेची झोड उठल्यानंतर राम कदम यांनी सारवासारव करीत हा व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा आरोप केला. हा व्हिडीओ अर्धवट दाखवून जनतेची दिशाभूल करू नका, असे राम कदम एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
थर लागलेल्या गोविंदाला खाली उतरवले
राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला अनेक सिने कलाकारांनी हजेरी लावली होती. प्राची देसाई ही अभिनेत्री व्यासपीठावर असताना त्यांनी तर चक्क आठ थर लागलेल्या गोविंदाला खाली उतरायला लावले. शेवटच्या थरावर एक लहान गोविंदा चढला असताना कदमांच्या दादागिरीमुळे हे सर्व थर खाली उतरून पुन्हा थर रचावे लागले.
महिलांची माफी मागा – नीलम गोऱ्हे
द्रौपदीच्या वस्त्रहरणात तिचे रक्षण करणाऱ्या श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी सणालाच राम कदम यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारे हे वक्तव्य असून बेजबाबदार व एकतर्फी प्रेमातून अपहरणाला चिथावणी देणारे आहे. त्यांनी सर्व महिलांची जाहीर मागायला हवी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
भाजपचा ‘रावणी’ चेहरा समोर आला – नवाब मलिक
घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रूपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रकक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राम कदम हे कुणाला कुठलीही मुलगी पसंत पडली तर त्या मुलींचे हरण करणार अशी भाषा कापरतात. त्यामुळे आजपासून राम कदम यांचे नामकरण रावण झालेले असून यापुढे ते रावण कदम म्हणून ओळखले जातील अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.




























































