गुरुवारी ‘एक्सप्रेस वे’ने पुण्याला जाणार असाल तर ही बातमी वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरून मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग गुरुवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली आहे. ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र खोळंबा होऊ नये म्हणून यावेळी शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई- पुणे मार्गावर वळविण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडतर्फे ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई- पुणे मार्गावर वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येईल. त्यामुळे अवजड वाहनचालकांनी आधीच नियोजन करावे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे.