
सामना प्रतिनिधी । नांदेड
आयुक्त स्तरावर पात्र, कार्योत्तर व त्रुटी पूर्तता केलेल्या विना अनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय, शाळांची आर्थिक तरतुदीसह यादी घोषित करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले.
राज्यात २२ हजार ५०० शिक्षक मागील वीस वर्षापासून १ हजार ३३६ शाळांमध्ये शिक्षणाचे कार्य करीत आहेत. नागपूर पावसाळी अधिवेशना दरम्यान सर्वच कनिष्ठ महाविद्यालयाची यादी आर्थिक तरतुदीसह घोषित करण्यासाठी अर्थमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. परंतु शासनाने अपूर्ण पणे घोषित केलेल्या १४६, आयुक्तस्तरावर पात्र असलेल्या ५५८, कार्योत्तर मान्यतेत अडकलेल्या २९५ व त्रुटीची पूर्तता केलेल्या ४८३ आणि ऑफलाईन मागविलेले सर्व प्रस्ताव अशा उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या आर्थिक तरतुदीसह घोषित कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आले.
या विषयी निर्णय न घेतल्यास दि.१० सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष प्रा.गोविंद वाघमारे, विभागीय उपाध्यक्ष प्रा.डी.आर.नालंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजय घोरबांड, विनोद वानखेडे, के.डी. खानसोळे, के.व्ही.कोकरे, शेख राजेसाब, जी.टी.शिंदे, एम.बी.फाजगे, ए.बी.जाधव आदींसह अनेक शिक्षकांनी सहभाग नोंदविला.





























































