
सामना प्रतिनिधी । कुडाळ
मालवण तालुक्यातील तळगाव राऊतवाडी येथील विजय विष्णू सावंत (64) हे आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याने आनंद दिगंबर साळगांवकर (38, रा.कविलकट्टा कुडाळ) व सुनिता पुंडलिक राठोड (25, रा.पानबाजार कुडाळ) या दोघांनी संगनमताने त्यांना ठार मारल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी दोन्ही संशयितांना कुडाळ पोलिसांनी अटक करून बुधवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विजय सावंत यांचा खून सुनिताच्या पानबाजार येथील खोलीत करण्यात आला. त्यानंतर त्याच रात्री सावंत यांचा मृतदेह पिशवीतून खांद्यावरून भंगसाळ नदीत नेऊन टाकण्यात आला, अशी कबुली सुनिताने दिली आहे. विजय सावंत यांची सुनिताशी ओळख होती. ते तिच्याकडे नेहमीच येत. ते आनंदला आवडत नव्हते. आनंद तिच्यावर प्रेम करू लागला होता. विजय वरून तो संशय घ्यायचा. दोघांच्या प्रेमात ते अडचण ठरत होते. यासाठी संगनमत करून त्यांना संपविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी निवती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण कुडाळ पोलीसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
विजय सावंत हे बेपत्ता झाल्याची खबर त्यांचा मुलगा सिद्धेश सावंत यांनी मालवण पोलीसांत दिली होती. 30 ऑगस्ट रोजी देवबाग संगम येथे एक मृतदेह तरंगताना दिसून आला होता. नंतर तो भोगवेच्या दिशेने गेल्याचे ग्रामस्थांनी मालवण पोलीसांना सांगितले. मालवण पोलीसांनी निवती पोलीसांना याबाबत कल्पना दिली. निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 रोजीच हा मृतदेह आढळून आल्यावर निवती पोलीसांनी तो बाहेर काढला. मुलगा सिद्धेश सावंत यांनी मृतदेहावरील कपडे व खिशातील मोटरसायकलच्या चावीवरून तो मृतदेह आपल्याच वडिलांचा असल्याचे ओळखले. त्यानंतर सिद्धेश सावंत यांनी वडिलांच्या डोक्यावर जखम असल्याने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून आनंद साळगांवकर व सुनिता राठोड या दोघांवर संशय असल्याचे सांगितले.
दरम्यान, विजय सावंत यांची मोटरसायकल सुनिताच्या घराशेजारी सापडून आल्याने अधिक संशय बळावला. कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती घेतली. कुडाळ पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.





























































