
सामना प्रतिनिधी, मुंबई
गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा उरलेला असताना थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 287 मंडळांना पालिका प्रशासनाने परवानग्या नाकारल्या आहेत. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता असून गंभीर बाब म्हणजे बिल्डरांच्या तक्रारींमुळे काही जुन्या मंडपांना परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत, असेही आता उघड होऊ लागले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रचंड संताप पसरलेला आहे.
न्यायालयाच्या अटींची पूर्तता करताना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आलेले असताना आता बिल्डरांच्या तक्रारींमुळेही मंडपांना परवानगी नाकारल्याचे उघड होऊ लागले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी चाळींचा पुनर्विकास होऊ घातला आहे. त्यामुळे तीस-चाळीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडपांनादेखील आपल्या जागांमध्ये बदल करावे लागले आहेत. या दरम्यान अनेक प्रकरणांत विकासकांनी मंडपांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींवरून अगदी आयत्या वेळेला मंडपांना परवानग्या नाकारल्या आहेत. बिल्डरांची दहशत इतकी आहे की, या मंडळांनी नाव न देण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
आकडा वाढणार
मंडपांसाठी अर्ज करण्यासाठी वाढवून दिलेली 5 सप्टेंबरची मुदत आज संपली असून आज दिवसअखेर एकूण 3517 अर्ज आले आहेत. त्यापैकी 287 मंडळांचे अर्ज नाकारले असून अजून 229 अर्जांची छाननी बाकी आहे. त्यामुळे परवानगी नाकारण्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परवानगी नाकारलेल्यांमध्ये बहुतांशी परवानग्या पोलिसांच्या पातळीवर नाकारलेल्या आहेत.
आलेले एकूण अर्ज – 3517
डबल आलेले अर्ज वगळले – 768
अर्ज विचारात घेतले – 2749
परवानग्या दिल्या – 2233
परवानग्या नाकारल्या – 287
परवानग्या का नाकारल्या ते जाहीर करा
दरम्यान, कोणत्या मंडळाला का परवानगी नाकारली याची माहिती पालिका प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असेल तर आम्ही पदाधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढू, असेही आवाहन त्यांनी समितीच्या वतीने केले आहे.
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सरकारचे आवाजावर निर्बंध
ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्य सरकारने आवाजावर निर्बंध आणण्याचे निर्देश दिले आहेत. सायलेंट झोन वगळून अन्य ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच वाद्ये तसेच लाऊडस्पीकर वाजवता येतील. तेही डेसिबलची मर्यादा ठेवूनच. त्याचप्रमाणे सायलेंट झोनमध्ये फटाके तसेच वाद्य वाजवण्यास पूर्णतः बंदी घालण्यात असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात आवाजाच्या डेसिबलची मर्यादा ठरवून दिली आहे. या डेसीबलच्या मर्यादेत राहून गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. मुंबईत सायलेन्स झोन म्हणजेच शांतता क्षेत्र ठरवून देण्यात आली असून हॉस्पिटल, शाळा, न्यायालये यांचा त्यात समावेश होतो. शांतता क्षेत्रात पूर्णवेळ कोणतेही वाद्य, लाउडस्पीकर लावण्यास किंवा फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. शांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी आवश्यक परवाना घेऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, संगीत वाद्य यांचा वापर आवाजाची ठरविण्यात आलेल्या पातळीच्या उल्लंघनाशिवाय करता येणार आहे.
एवढाच आवाज चालणार
औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल वरात्री 70 डेसिबल, बाजार क्षेत्रात दिवसा 65 व रात्री 55 डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 व रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 50 डेसिबल व रात्री 40 डेसिबल अशी ठरविण्यात आली आहे.
या क्रमांकावर तक्रार करा
शांतता क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी मुख्य नियंत्रण कक्षातील 100 क्रमांक तसेच 7738144144 किंवा 7738133133 या क्रमांकावर एसएमएस द्वारे तक्रार करावी, असे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले आहे.
summary- BMC denied 287 applications for ganpati mandap




























































