तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वी बरखास्त,पंतप्रधान मोदींची फूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हैदराबाद

विधानसभा निवडणुकीस सात-आठ महिन्यांचा कालावधी राहिला असतानाच तेलंगणाचे मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि विधानसभा बरखास्त केली. त्यामुळे तेलंगणात मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तेलंगणातील या राजकीय घडामोडींमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फूस असल्याची चर्चा आहे. चंद्रशेखर राव आणि त्यांचा तेलंगणा राष्ट्रीय समिती हा पक्ष म्हणजे भाजपची कठपुतली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

तेलंगणा राज्य अस्तित्वात आल्यानंतर 2014 मध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेची पहिल्यांदाच येथे निवडणूक झाली. तेलंगणा राष्ट्र समितीला विधानसभेच्या 119 जागांपैकी 90 जागा मिळाल्या. काँग्रेसला 13 तर भाजपला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. तेलंगणा विधानसभेची मुदत 2019 मध्ये संपणार होती, मात्र मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि राज्यपालांकडे सोपविला. त्यामुळे विधानसभा बरखास्त झाली आहे.

105 उमेदवारांची यादीही जाहीर

मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीची चंद्रशेखर राव यांना घाई झाल्याचे चित्र दिसले. त्यांनी विधानसभा बरखास्तीबरोबरच आगामी निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या 105 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.

सहा लकी नंबर

चंद्रशेखर राव यांच्यासाठी भाग्यवान ठरणाऱया सहा अंकाला ते नेहमीच महत्त्व देतात. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक आज 6 सप्टेंबरला सकाळी 6.45 ला बोलावली होती. आजच त्यांनी मंत्रिमंडळ विसर्जनाचा निर्णय घेतला.

विदूषक आणि कटपुतली

विधानसभा मुदतपूर्व बरखास्त केल्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते विदूषक असल्याचे म्हटले. त्यावर काँग्रेस पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष हे भाजपची कटपुतली आहेत. आता विधानसभा निवडणुकीतच जनता त्यांना उत्तर देईल असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.