
सामना ऑनलाईन, मुंबई
ना खाऊंगा न खाने दूंगा असं म्हणत मोदी सरकार केंद्रात विराजमान झालं. हे सरकार सत्तेत आल्यानंतरही काही अधिकाऱ्यांची पैशांची हाव कमी झालेली नाही. हे अधिकारी बिनधास्तपणे पैसे खात आहेत. सुभाष कट्टे नावाच्या एका अधिकाऱ्याने तर कहर केला आहे. लाच घेतल्याबद्दल यापूर्वी दोन वेळा रंगेहाथ पकडलेल्या कट्टे यांना ५ सप्टेंबर रोजी पुन्हा लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. या अटकेमुळे महाराष्ट्रातील प्रशासन पुन्हा एकदा बदनाम झालं आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की २२ मार्च १९९६ साली कट्टे यांना पहिल्यांदा रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यावेळी ४०० रूपयांची लाच घेताना ते पकडले गेले होते. या प्रकरणात सबळ पुराव्यांच्या अभावी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांना २ हजार रूपयांची लाच घेताना पुन्हा पकडण्यात आलं. या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध बीड मधल्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. ५ सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा एकदा २ हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं.



























































