35 हजारांसाठी सिद्धार्थ संघवी यांचा गळा चिरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
siddharth-sanghavi-murderer

सामना प्रतिनिधी । मुंबई

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा अखेर आज सकाळी कल्याणमध्ये मृतदेह सापडला. बुधवारीच कमला मिलच्या पार्किंग एरियामध्ये संघवी यांची गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्याच कारने मृतदेह कल्याणला नेऊन रस्त्यालगतच्या झुडुपात फेकल्याचे आरोपीचे म्हणणे असून 35 हजारांसाठी संघवी यांची हत्या केल्याचा दावा आरोपी करीत आहे; परंतु आरोपीचे बोलणे संशयास्पद वाटत असून या गुह्याचा कसून तपास केला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सिद्धार्थ संघवी हे बेपत्ता असल्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी रविवारी कौपरखैरणे परिसरात राहणाऱया सर्फराज शेख याला पकडून ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

मग पोलिसांच्या चौकशीत संघवी यांची हत्या केल्याची कबुली देत त्यांचा मृतदेह जेथे फेकला होता ती जागा सर्फराजने पोलिसांना दाखवली. आज सकाळी पोलिसांनी कल्याणच्या नवलीपाडा परिसरातील झुडुपात फेकलेला संघवी यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह ताब्यात घेतला. संघवी यांचा गळा चिरला तसेच त्यांच्या शरीरावर अनेक वार केल्याचे शेखचे म्हणणे आहे. पैशांची खूप गरज होती. त्यामुळे संघवी यांच्याकडून पैसे घेता येतील असे ठरवून त्या दिवशी त्यांना गाठले होते; पण चाकूचा धाक दाखवून सुद्धा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचवेळी आमच्यात झटापट झाली आणि चाकूने संघवी यांचा गळा चिरला असे सर्फराज शेख सांगत आहे. पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्याची कसून चौकशी करावी लागणार आहे.

8 तारखेला वडिलांना कॉल

8 तारखेच्या सायंकाळी सिद्धार्थ यांच्या वडिलांना सर्फराजने कॉल केला होता. तुमचा मुलगा माझ्या ताब्यात असून सुखरूप आहे. कुठेही जाऊ नका, काळजी करू नका, असे सर्फराज तेव्हा संघवींच्या वडिलांना बोलला होता. त्यामुळे आम्ही तेव्हा संघवी यांचे अपहरण केल्याचे कलम वाढवले होते. जेव्हा सर्फराज हाती लागला तेव्हा पैशासाठी हत्या केल्याचे त्याने सांगितल्यानंतर रॉबरी, मग संघवींचा मृतदेह सापडल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.

त्या पाच दिवसांत काय घडले?

बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास सिद्धार्थ घरी जाण्यासाठी कार्यालयातून निघाले; पण ते मलबार हिल येथील घरी पोहचले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली.

त्याच संध्याकाळी सर्फराजने पार्किंग परिसरात संघवी यांचा गळा चिरून मग शरीरावर वार केले. त्यांच्याच कारमधून मृतदेह कल्याणला नेला व तेथील झुडुपात फेकला.

त्यानंतर कोपरखैरणे येथे संघवी यांची कार सापडली. कारमध्ये चाकू सापडला तसेच रक्ताचे डाग मिळाले.

8 तारखेला सर्फराजने संघवी यांच्याच मोबाईलमध्ये स्वतःचे सिमकार्ड टाकून त्यांच्या वडिलांना फोन केला.

रविवारी नवी मुंबई पोलिसांनी सर्फराजला कोपरखैरणे येथून ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले.

आज सकाळी कल्याण येथे संघवी यांचा मृतदेह सापडला.

सिद्धार्थच का?

सर्फराज हा ओला कार चालविण्याआधी कमला मिलच्या त्या पार्किंग परिसरात तीन वर्षे फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्यामुळे कोण कुठे कामाला आहे, कोणाकडे किती पैसा आहे याची त्याला माहिती होती. म्हणून त्याने पैसे उकळण्यासाठी सिद्धार्थ संघवी यांना टार्गेट केले होते, असेही तो बोलत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संघवी यांच्या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का, त्यांची हत्या करण्यामागचे नेमके कारण काय या आणि अशा अनेक बाबींचा खुलासा होणे बाकी आहे. कोर्टाने सर्फराजला 19 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली असून त्याच्याकडे आणखी चौकशी केली जाईल, असे पोलीस उपायुक्त अभिलाष कुमार यांनी सांगितले.