
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
‘अविष्कार’ गतीमंद मुलांच्या शाळेत गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. अविष्कार संस्थेतील मुलांनी कागदाचा लगदा आणि शाडूच्या मातीचा उपयोग करुन इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला. गेली ३३ वर्ष रत्नागिरीत गतीमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या अविष्कार संस्थेत विविध उपक्रम राबविले जातात. गेली २२ वर्ष अविष्कार संस्थेत गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस हा गणेशोत्सव संस्थेत साजरा होतो.
मार्गदर्शक दिप्तेश पाटील यांच्या सोबत अविष्कार मधील विद्यार्थ्यांनी गणेशमुर्ती तयार केली.७० टक्के कागदाचा लगदा आणि ३० टक्के शाडूची माती वापरुन ही गणेशमुर्ती तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणपती बाप्पाची वाजत गाजत आगमनाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या सभागृहात प्रतिष्ठापना करत पुजाअर्चा करण्यात आली.अविष्कारच्या गणेशोत्सवात सकाळी ११ वाजता विद्यार्थी आरती करतात, त्यानंतर विद्यार्थी भजनात दंग होतात. गणेशोत्सवात एक प्रदर्शनही मांडण्यात येते. या प्रदर्शनात अविष्कार मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू मांडण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून तयार झालेल्या या वस्तू पहाण्यासाठी नागरिक संस्थेत येतात. अविष्कारच्या गणेशोत्सवाचे विसर्जनही वाजत गाजत करण्यात येते. इको फ्रेंडली गणेशोत्सवातून विद्यार्थी सामाजिक संदेश देतात.

































































