अतिरिक्त जिल्हाधिकारी दुबे जेव्हा स्वतःच फलक हातात घेतात…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मेहकर

मतदार नोंदणी बाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या सद्हेतूने काढण्यात मेहकरमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. या दरम्यान एका खासगी वाहनाने आलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी विद्यार्थ्यांच्या हातातील फलक स्वतःच्या हातात घेत आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत उच्च पदावर असतांना देखील आपले पाय जमिनीवरच असल्याचे दाखवून दिले.

गुरुवारी मेहकर येथे मतदार जनजागृती साठी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी या प्रभात फेरीत विविध शाळांमधील विध्यार्थी, त्यांचे शिक्षक यांच्यासह उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार संतोष काकडे सहभागी झाले होते. सदर रॅली जिजाऊ चौकानजीक येताच शिवाजी शाळेत अतिरिक्त जिल्हाधिकारी एका खासगी गाडीने प्रभात फेरी नजीक आले व गाडीतून उतरून सरळ फलक हातात घेऊन चालायला लागले. विद्यार्थी-शिक्षकांना ते नेमके कोण आहेत हे लक्षात देखील आले नाही. मात्र जेव्हा तहसीलदार संतोष काकडे समोर आले तेव्हा प्रत्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हेच फलक घेऊन प्रभात फेरीत सहभागी झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी शेतात जाऊन शेंगाची तोडणी केलेली असतांना आणि श्रमदाना दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकारी दुबे यांनी कुठलाही संकोच न बाळगता हातात टोपले घेऊन श्रमदान केले असतांना त्यांचे गुरुवारी प्रभात फेरीत हातात फलक घेऊन सामील होत नागरिकांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेण्यासाठी प्रेतीत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

एसडीओ कार्यालयात बैठक
अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी मतदार नोंदणी बाबत एसडीओ कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केलेयावेळी एसडीओ राजेश पारनाईक, तहसीलदार संतोष काकडे,नायब तहसीलदार कु मगर, व सर्वच मंडळ अधिकारी हजर होते.