
हिंदूंच्या सणांवर सगळय़ात जास्त बंधने भाजप राजवटीतच येत आहेत. गणेश मंडपांचे खांब उभारण्यासाठी मंडळांना युद्ध करावे लागले. महागाईविरुद्ध पुकारलेला बंद ठोकरून लोकं गणेशोत्सवास महत्त्व देतात या मागची भावना राज्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. देव घरी येत होते. लोकमान्य टिळकांनी देव सार्वजनिक केले त्यामागे ब्रिटिश राज्याविरुद्धचे राजकारण होते. ते टिळकांनी यशस्वी केले. टिळक कर्मठ हिंदुत्ववादी होते. देव आणि धर्माचे टिळकांनी केलेले सार्वजनिकीकरण स्वातंत्र्यलढय़ाच्या पथ्यावर पडले. तो मोठा उत्सव आजही सुरूच आहे, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील सार्वजनिक गणेशोत्सव आता नियम आणि कायद्याच्या वरवंटय़ाखाली अडकला. सार्वजनिक गणपतीचे मंडप उभारण्यावरून वाद सुरू झाला तो संपलेला नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाने आवाजाचा कलकलाट वाढतो हे खरे, पण गेली 100 वर्षे मशिदींवरील भोंग्यांचा कलकलाट सुरूच आहे व त्याचा त्रास कुणाला होऊ नये याचे आश्चर्य वाटते. भाजपचे राज्य हे हिंदू संस्कृतीला महत्त्व देणाऱयांचे राज्य हा समज आहे, पण सार्वजनिक गणेशोत्सवांवर सगळय़ात जास्त बंधने याच राजवटीत आली.
धर्माचा जागर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘सरसंघचालक’ मोहनराव भागवत सध्या शिकागो येथे आहेत. त्यांनी हिंदुत्वाचा मंत्र शिकागोतून दिला. हिंदूंनी एकजूट दाखवायला हवी हे त्यांनी सांगितले. त्यापुढे जाऊन ते म्हणाले, हिंदूंना वर्चस्व गाजवायची ईर्षा नाही. श्री. मोहन भागवत यांनी या दोन्ही मुद्यांवर मुंबईत येऊन सार्वजनिक गणेश मंडळांशी बोलायला हवे. सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव हा हिंदुत्वाचाच जागर असतो, पण त्यावर सरकारी बंधने आली आहेत व हे सरकार काँगेस किंवा डाव्यांचे नाही. हिंदूंनी वर्चस्व गाजवावे अशी भागवतांची भूमिका आहे, पण हिंदूंना त्यांच्या राज्यात श्रीगणेश उत्सवाच्या मंडपासाठी एक खांबही उभारता येत नाही व खांब उभारणारे अपराधी ठरवले जातात. त्यामुळे हिंदूंनी वर्चस्व गाजवायचे कसे? दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रीत हिंदूंचे संघटन होते व ते राजकारणविरहित असते. तिथेही हिंदुत्वाच्या पायात ‘बेडय़ा’ घालून त्यांना खाली बसवले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव होता व त्यास धर्माचे अधिष्ठान होते. गणेशोत्सवासाठी रस्ते व्यापले जात नव्हते, आता ते व्यापले जातात. टिळक युगात लाऊडस्पीकरची बोंब नव्हती व आजच्याप्रमाणे गर्दीचे लोंढे नव्हते हे मान्य केले तरी शेवटी स्वातंत्र्याबरोबर धर्म व श्रद्धेचेही व्यापारीकरण होते व ते स्वीकारावे लागेल. उत्सवांचे व्यापारीकरण करणाऱया मंडळांना व ज्या उत्सवांत मुख्यमंत्र्यांपासून सर्वच राजकीय नेते व नट मंडळी जातात त्यांना मंडपांच्या परवानग्या जितक्या सहजतेने मिळतात तशा त्या इतरांना मिळत नाहीत. शेवटी फक्त हिंदुत्वच नाही, तर मराठीपण सामावून घेतलेले हे सगळे उत्सव आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
टिळकांची भूमिका
लोकमान्य टिळक हे स्वराज्यासाठी अधीर होते आणि समाजातील अनेकविध मतांचे लोक आपापल्या परीने स्वराज्य जवळ आणण्याचे प्रयत्न करू शकतात असे त्यांना वाटत असे. लोकमान्यांचे क्रांतिकारकांशी संबंध होते व क्रांतीसाठी ‘बॉम्ब’ बनविणाऱया तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवण्यावर त्यांचा भर होता. टिळक जहाल होते. सार्वजनिक उत्सवांतून त्यांनी तरुण मुलांना क्रांतिकारक बनवले व त्यातून चापेकर बंधूंना घडवून हौतात्म्यासाठी तयार केले. आता गणेशोत्सव हे एक ‘मार्केट’ बनले आहे. येथे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते व त्यातून लोकांच्या उपजीविका चालतात. लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, गणेशगल्ली अशा मोठय़ा सार्वजनिक मंडळांच्या तिजोरीत गणेशोत्सव काळात कोटय़वधी रुपये जमा होतात व ते सर्व सार्वजनिक उपक्रमांसाठी कसे वापरले जातात त्यासाठी ‘मंडपां’ना विरोध करणाऱयांनी ‘लालबागचा राजा’चे सामाजिक काम पाहायला हवे. हिंदुत्व आणि धर्माचे संघटन हा वेगळा विषय आहे, पण 11 दिवस एक शक्ती रस्त्यावर रांगेत असते, उसळताना जगाला दिसते. असे उत्सव हीच देश आणि धर्माची ताकद ठरावी!
बंद झिडकारला
महाराष्ट्रातील जनता गणेशोत्सवापुढे कसलीही पर्वा करीत नाही हे सोमवारच्या फसलेल्या ‘भारत बंद’वरून सिद्ध झाले. पेट्रोल-डिझेलच्या भयंकर दरवाढीविरुद्ध काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. पेट्रोल-डिझेलचे भाव नव्वद रुपये लिटरपर्यंत पोहोचले. त्यामुळे महागाईत होरपळणारी जनता मुंबई-महाराष्ट्रातील बंदमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा बंदकर्त्यांना होती, पण ती फोल ठरली. महागाई सहन करू, पण गणेशोत्सवातील विघ्न सहन करणार नाही असेच जणू जनतेने सांगितले. महागाईचे ओझे पाठीवर घेऊन जनतेने श्री गणेशाला मिरवत आणले आणि घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी विराजमान केले. महागाईच्या झळा सहन करीत साजरा होणारा हा उत्सव. गणेशाला काही कमी पडू द्यायचे नाही ही सामान्य जनतेची भावना आहे. म्हणूनच महागाईचे भूत मानगुटीवर बसलेले असूनही लोक दहा दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष करतात. मोदींचे भक्त अंध आहेत अशी टीका होत असते, पण श्री गणेशाचे भक्त अंध नाहीत हेच या उत्सवात दिसते. फक्त प्रश्न इतकाच की महागाईच्या वावटळीमुळे गणेशभक्तांच्या विझलेल्या चुली पुन्हा पेटतील काय?
ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]



























































