‘ब्रेबॉर्न’शी असलेली नाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

लंडन हे माझं शहर असलं तरी लंडनबाहेरचं इंग्लंड, तिथली गावं मला प्रचंड आवडतात. ती गावं पाहताना आपण न संपणारं कॅलेंडर पाहतोय असं वाटतं. देव नावाच्या चित्रकाराची ती निसर्ग रेखाटनं असतात. प्रत्येक गावात एक पब, एक चॅपेल, एक पोस्ट ऑफिस असतं. आता पोस्ट ऑफिसं कमी झाली. पब्जमध्ये मद्याच्या, विशेषतः बीअरच्या किमती वाढल्या. त्यामुळे तिथे होणारी गर्दी कमी झाली. त्यामुळे काही पब्ज बंद झाली, पण तरीही ज्या ज्या गावात मी गेलो, तिथे पब पाहिलाच पाहिला.

यावेळी पुन्हा मी डॉक्टर गोविंद काणेगावकरांचं बोट धरून काही ऐतिहासिक गावं पाहिली. इतिहासाच्या प्रेमाबाबत आम्ही दोघंही एकाच वेव्ह लेंग्थवर आहोत. त्यांना इंग्लंडचा इतिहास मुखोद्गत आहे. इंग्लंडमध्ये ते जवळ जवळ पन्नास वर्षे स्थायिक आहेत. अर्थात ही एकच गोष्ट त्याला कारणीभूत नाही. इथली बरीच मंडळी अजून ‘निवडक’ हिंदुस्थानी इतिहासात रमलेली असतात. डॉ. काणेगावकरांना हिंदुस्थानी इतिहास ठाऊक आहेच, पण इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यावर त्यांनी इंग्लंडमधल्या इतिहासाचा अभ्यास केला.

आम्ही एका अशा गावात गेलो जिथे माझ्या लहानपणाच्या आठवणी बूच काढलेल्या शॅम्पेनसारख्या उसळून आल्या आणि हो, त्या रात्री डॉक्टरांनी शॅम्पेन उघडलीच. त्या गावाचं नाव होतं ब्रेबॉर्न. डोक्यात प्रकाश पडला? आपल्याकडे मुंबईत ज्या लॉर्ड ब्रेबॉर्नच्या नावाने स्टेडियम आहे, त्या बेबॉर्नचं गाव. आपल्याकडे गावाच्या नावाला ‘कर’ जोडलं की, आडनाव होतं. इथे आडनावं ही थेट गावावरून घेतलेली असावीत. उदा. ‘बेबॉर्न’ किंवा ‘हेस्टिंग्ज’ वगैरे.

ब्रेबॉर्न स्टेडियम हा सीसीआय म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचा आहे. हा क्लब स्थापन कुठे झाला, तर 8 नोव्हेंबर 1932 रोजी दिल्लीत, पण स्टेडियम बांधला मुंबईत. कारण मुंबई हे क्रिकेटचं माहेरघर वगैरे. अँथनी डिमेलो हे क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि सीसीआय, दोन्हीचे सेक्रेटरी होते. त्यांनी लॉर्ड ब्रेबॉर्नबरोबर जागेच्या वाटाघाटी केल्या. कारण त्यावेळी तो मुंबईचा गव्हर्नर होता. समुद्रात भराव घालून केलेल्या नव्वद हजार चौरस यार्डवर हा स्टेडियम उभारला गेला. असं म्हणतात की, डिमेलो आणि बेबॉर्नमध्ये जी मीटिंग झाली त्यात म्हणे निघता निघता डिमेलोंनी लॉर्ड ब्रेबॉर्नला विचारलं, ‘‘तुमच्या सरकारला आमच्याकडून पैसे हवेत की तुम्हाला अमरत्व?’’ ब्रेबॉर्ननं ती जमीन फक्त साडेतेरा रुपये चौरस यार्डने दिली. लॉर्ड ब्रेबॉर्नचं नाव स्टेडियमला देण्यात आलं आणि ते नाव कधीही न काढण्याचा करार केला गेला. हिंदुस्थानी क्रिकेटचं ‘लॉर्डस्’ तयार करण्याचा हा प्रयत्न होता. वानखेडे स्टेडियम उभं राहिलं तरी ब्रेबॉर्नच्या आठवणी कधी पुसल्या गेल्या नाहीत. उलट सीसीआयला जायचं म्हटल्यावर मला तिथल्या तिथे आनंद होतो.

तर असं ते ब्रेबॉर्न, या लॉर्ड ब्रेबॉर्नचं पिढीजात गाव.

केंट परगण्यातल्या ऍशफोर्ड जिल्हय़ातलं हे गावं. गावात मध्यावर ‘फाईव्ह बेल्स’ नावाचा पब आहे. मद्याचं हे मंदिर. मद्यपी भक्तांच्या तीर्थप्रसादासाठी असतं. दुपारची वेळ असल्याने आम्ही आत गेलो नाही. ब्रेबॉर्नचं गावच नशेसाठी पुरेसं होतं. कृत्रिम नशेची गरज नव्हती. सर्वत्र हिरवंगार होतं. धष्टपुष्ट जर्सी गाई चरत होत्या. या गावातली बरीच जमीन आणि घरं त्यांनी विकून टाकली तरीही अडीच हजार एकरचं शेत आणि साठ वास्तू ब्रेबॉर्न कुटुंबाच्या आहेत. माझ्या वडिलांचं एक आवडतं वाक्य होतं, ‘पैसा पैशाकडे धावतो.’ आमच्याकडे तो नव्हता. त्यामुळे आमच्याकडे रांगतही तो आला नाही. या लॉर्ड ब्रेबॉर्नचा नातू चार्ल्स ब्रेबॉर्न आज हयात आहे. साधारण माझ्या वयाचा असावा. डॉ. काणेगावकरांच्या कृपेने मी त्याच्याशी फोनवर बोललो. त्याचं आजोळही इतिहासाशी त्याला घट्टपणे जोडून टाकतं. तो लॉर्ड माऊंटबेटनच्या मुलीचा मुलगा. ‘‘पैसा पैशाकडे धावतो’’ असं म्हणणारे माझे वडील द्रष्टे आहेत की नाहीत? या चार्ल्सला आईकडची प्रॉपर्टीही मिळाली.

चार्ल्सला अर्थात ब्रेबॉर्न स्टेडियमचा अभिमान आहे. तो त्याच्या प्रचंड संपत्तीचा भाग नसला तरी नावाचं अमरत्व कुणाला नाही आवडत? आम्हाला शाळेत असताना एक इंग्लिश कविता होती. त्या कवितेचे मला नाव आठवत नाही. कवीही आठवत नाही, पण त्यातली पहिली ओळ होती, “Fame is a food that dead men eat.” हे अर्थसत्य आहे. तेच जेवण त्याचे वंशज जिवंतपणी मिटक्या मारत जेवतात. आपल्या स्टेडियमला ‘ब्रेबॉर्न’चं नाव नसतं तर डॉ. काणेगावकर किंवा मीसुद्धा गाव हुडकत गेलो असतो का? त्याने 1973 साली शेवटची भेट ब्रेबॉर्न स्टेडियमला दिली होती. 1973 साली हिंदुस्थान-इंग्लंडचा कसोटी सामना तिथे खेळवला गेला. एकही चेंडू दृष्टीआड होऊ न देता तो सामना मी ईस्ट स्टॅण्डमधून पाहिला होता. ईस्ट स्टॅण्डचं तिकीटही तेव्हा ऑस्करसारखं वाटे. त्यानंतरचा एखादा अपवाद सोडता पुढचे कसोटी सामने वानखेडेवर खेळवले गेले.

चार्ल्स ब्रेबॉर्नपेक्षा माझी नाळ ब्रेबॉर्न स्टेडियमशी जास्त घट्टपणे बांधली गेली होती. मी तिथे चंदू बोर्डेला कसोटी सामना जिंकून देताना पाहिलं होतं. कॉलर वर, शर्टाची बटणं उघडी टाकत एखाद्या सम्राटासारखं फलंदाजीला जाताना सर गारफिल्ड सोबर्सला तिथेच पाहिलं होतं. माझ्या लाडक्या अजित वाडेकरच्या फटक्यांच्या धबधब्यात मी तिथेच ओलाचिंब झालो होतो. रमाकांत देसाईने उडवलेल्या दांडय़ा आजही माझ्या भावविश्वाचा भाग आहे. त्याच्या बोलण्यावरून चार्ल्स ब्रेबॉर्नसाठी ब्रेबॉर्न स्टेडियम अभिमानाचा भाग वाटला. माझ्यासाठी ती भावनिक गुंतवणूक आहे. त्वचेत रुतलेल्या केसाप्रमाणे मनात घट्ट रुतलेली भावनिक गुंतवणूक. हा चार्ल्स ब्रेबॉर्न लॉर्डस्वर क्रिकेट पाहायला जातो. त्याचं एक कौटुंबिक क्रिकेट मैदान आहे. त्याचं वर्णन त्याने ‘‘व्हिलेज क्रिकेट ग्राऊंड’’ असं केलं. इंग्लंडमधली व्हिलेज ग्राऊंडही आपल्या शहरी ग्राऊंडपेक्षा समृद्ध असतात. ब्रेबॉर्नच्या जवळच एक मरशॅम गावचं खेडय़ातलं मैदान मी पाहिलं. हिरवंगार, टर्फची खेळपट्टी, त्यावर आधुनिक कव्हर्स, समोर साईट स्क्रीन आणि काडेपेटय़ांसारखं वाटणारं क्लब हाऊस. मैदान पाहिल्याबरोबर हात शिवशिवतात. इतिहास तुमच्यात न पाहिलेल्या गोष्टीबद्दल ममत्व निर्माण करू शकतो. ध्यानीमनी नसताना ब्रेबॉर्न नावाचं गाव मला आपलंसं वाटलं.

– [email protected]