
>> विवेक दिगंबर वैद्य
‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातील तत्त्वज्ञानाकडे ‘डोळस’पणे पाहा असे सांगणाऱया श्रीगुलाबराव महाराजांविषयीचा हा लेख.
अमरावतीच्या उत्तरेला चांदूर (बाजार) तालुक्यातील माधान नावाचे एक खेडेगाव ‘मोहोडांचे माधान’ म्हणूनही ओळखले जाते. येथे राहणाऱया गेंदूजी व अलोकाबाई मोहोड यांच्या पोटी श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झाला. अमरावतीच्या दक्षिणेला सुमारे 13 मैल दूर अंतरावरील लोणी टाकळी येथे असलेल्या आपल्या आजोळी आषाढ शु. दशमी, शके 1803 अर्थात दिनांक 6/7/1881 रोजी श्री गुलाबराव महाराज जन्म घेते झाले. पुढे पाच महिन्यांच्या बाळ गुलाबसह अलोकाबाई सासरी, माधान येथे आल्या.
तेजस्वी डोळे, तरतरीत नाक, सावळा वर्ण आणि पुष्ट शरीरयष्टी लाभलेली ही बालमूर्ती मोहोड कुटुंबीयांसाठी कौतुकाचा विषय होती. मात्र दुदैवाने त्यांच्या कौतुकाला पुढे औदासिन्याचे ग्रहण लागले. अवघ्या आठ महिन्यांच्या गुलाबला डोळे आल्याचे निमित्त झाले आणि कुण्या वैदूने केलेल्या चुकीच्या औषधोपचाराने बाळाचे आयुष्य कायमचे अंधारून गेले. या अंधत्वाने गुलाबची साथसोबत अखेरपावेतो केली.
पाहता पाहता गुलाब चार वर्षांचा झाला. दरम्यान, गेंदूजी आणि अलोकाबाईंच्या संसारवेलीवर आणखी एक फूल उमलले. अंध गुलाबला साथ देण्याकरिता जन्मलेल्या या धाकल्या बहिणीची ओळख पुढे ‘रंगी’ या नावाने झाली असली तरी तिच्या येण्यामुळे गेंदूजींच्या संसारावर मात्र गर्द काळोखी रंगाची छटा पसरली. रंगीला जन्म देतेवेळी बाळंतरोगाचे निमित्त होऊन अकोलाबाई इहलोक सोडून गेल्या. जन्मलेले बाळ आणि गुलाब दोघेही मातृसुखाला पारखे झाले.
गुलाब आणि रंगीला त्यांच्या आजीने लोणी येथे आजोळी नेले आणि त्यांचे संगोपन अतिशय निगुतीने केले. दोघा भावंडांना, विशेषतः गुलाबला आजीचा फार लळा होता. ते आजीला ‘बाई’ म्हणून संबोधत असत. दैवगतीने गुलाबवर अन्याय केला असला तरी त्याची सल गुलाबने कधीही वागवली नाही. गुलाब बालपणापासून अतिशय खोडकर होता. त्याच्या खेळण्यात व हिंडण्याफिरण्यात स्वच्छंदीपणा होता. अंध असूनही तो विलक्षण धाडसी होता. त्याचे वागणे, बोलणे आणि चालणे, फिरणे यावरून त्याचे अंधत्व कधी कुणास जाणवले नाही. त्याची वर्तणूक डोळस माणसाप्रमाणे होती. इतकेच नाही, तर त्याची बुद्धीदेखील कमालीची तल्लख अन् कुणाच्याही नजरेत भरणारी होती.
गुलाबला भविष्यात घडणाऱया गोष्टींचा अचूक अंदाज येत असे. सदान्कदा आजीच्या आगेमागे घुटमळणारा गुलाब तिच्याजवळ पुढे घडणाऱया गोष्टी आधीच सांगत असे. गुलाबचा मामा बाजीराव याने त्याची पहिली पत्नी वारल्यानंतर दुसरे लग्न केले. घरात नव्याने दाखल झालेली मामी चालू लागली की, गुलाब तिच्या पावलांचा अंदाज घेत असे. हे पाहून एकदा आजीने त्याला हटकला असता गुलाब म्हणाला, ‘‘बाई, मामी चालते तेव्हा तिच्या जोडव्यांचा आवाज येतो. तो काहीतरी विपरीत घडणार असल्याची सूचना देणारा आहे. तो आवाज मामी लवकरच विधवा होणार असल्याचे सांगणारा आहे.’’ काही दिवसांतच गुलाबचे सांगणे खरे झाले. बाजीरावमामा तडकाफडकी मरण पावला आणि मामी विधवा झाली. घडल्या प्रकारामुळे गुलाबची आजी धास्तावली. तिच्या नजरेला गुलाबमधील बदल लक्षात येत होते. गुलाबचा आजोळचा मुक्काम सहा वर्षांचा होता. या कालावधीत त्याच्यामधील ईश्वरभक्ती, अतींद्रिय ज्ञान, बुद्धिवैभव, स्वयंपूर्ण प्रतिभा आदी दैवी गुण जवळपासच्या प्रत्येकाला जाणवून आले. पुढे सन 1890च्या प्रारंभी गुलाबला माधान येथील त्याच्या मूळ घरी आणण्यात आले. माधानला आल्यापासून गुलाबच्या अंगातील सुप्त दैवी गुण अधिका प्रकट होत गेले, वाढते झाले.
माधानमध्ये असताना एकदा खेळता खेळता गुलाब शेजारी सीताराम भुयार यांच्या घरी गेले. तिथे भुयारांची आई मैनाबाई आपल्या लहानग्या नातीसोबत बसली होती. मैनाबाई गुलाबला सहज थट्टेने म्हणाली, ‘‘एक बुक्का मारून नारळ फोडलास तर माझ्या नातीचे लग्न तुझ्याशी लावून देईन.’’ गुलाबने एका बुक्कीत नारळ फोडला आणि म्हणाला, ‘‘आता पिच्छा पुरवून तुमच्या नातीशी लग्न करीन.’’ काही दिवसांनी फाल्गुन शुद्ध 5 शके 1814 (सन 1892) रोजी याच मुलीशी अर्थात मायबाईशी गुलाबचा विवाह झाला.
गुलाबवर वात्सल्याची पखरण करणाऱया सारजाताई अन् वडील गेंदूजी सन 1897 मधील प्लेगच्या साथीत एकाएकी मरण पावले. येणारा काळ अत्यंत उदास मनःस्थितीत घालवणाऱया गुलाबचे रूपांतर श्री गुलाबराव महाराजांमध्ये होण्याची ही सुरुवात होती. मातापित्याचे छत्र यापूर्वीच हरपलेल्या गुलाबरावांनी पुढे श्री ज्ञानेश्वर महाराजांना त्यांची ‘माऊली’ म्हणून स्वीकारले. इथून पुढे गुलाबराव महाराजांनी ज्ञानमार्गाची निवड केली आणि तब्बल 128 अजरामर ग्रंथांची निर्मिती केली. लौकिकार्थाने अंध व अशिक्षित असलेल्या गुलाबरावांनी तत्त्वज्ञानाला ललामभूत ठरणारी ग्रंथसंपदा निर्माण करावी ही आश्चर्याची आणि सर्वसामान्यांस थक्क करणारी घटना होती.
दरम्यान, श्री गुलाबराव महाराजांनी काही निवडक व्यक्तींना मंत्रदीक्षा दिली. त्यांनी वेद-पुराणांसोबतच ‘कुराण’ व ‘बायबल’ या ग्रंथांचाही अभ्यास केला. तसेच पूर्णा नदीच्या पात्रात बसून धौती-बस्ती इत्यादी हठयोगाच्या क्रियाही केल्या. ते मानसपूजेत बसले असताना सर्वत्र बुक्क्याचा सुगंध दरवळत असल्याचा अनुभव अनेकांना येत असे.
श्री गुलाबराव महाराजांच्या शब्दात सामर्थ्य होते. त्यांना दिव्य दृष्टी होती. ते बाह्यतः अंध दिसत असले तरी एखाद्या डोळस विचारवंतालाही लाजवील असे प्रगाढ ज्ञान त्यांच्यापाशी होते. त्यांच्यामध्ये अवर्णनीय प्रज्ञा स्थिरावली होती. एखाद्या ग्रंथाला केवळ स्पर्श करून ते त्या गंथामधील मजकूर सांगत. तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी डार्विन, स्पेन्सर आदी आंग्ल भाषिक विचारवंतांच्या रूढ मतांचेही साक्षेपी खंडन केले. यावरून गुलाबरावांच्या विद्वत्तेमागील श्रेष्ठत्व लक्षात येते.
श्री गुलाबराव महाराजांची आळंदी येथील पहिली वारी सन 1904 मध्ये झाली. पत्नी मायबाईंसह ते दरवर्षी आळंदीस जात असत. सन 1901 मध्ये श्री गुलाबरावांना ज्ञानेश्वर माऊलींकडून प्रत्यक्ष अनुग्रह प्राप्त झाला. पुढे स्वतःस ‘माऊलीकन्या’ म्हणून स्वीकारलेल्या श्री गुलाबरावांनी आपला विवाह श्रीकृष्णाशी लावून घेतला. ते स्वतःस श्रीकृष्ण‘पत्नी’ समजू लागले. मंगळसूत्र-कुंकू आदी सौभाग्य चिन्हे तसेच श्रीकृष्णपत्नीस साजणारा गोपीवेश ते नित्य धारण करीत असत. ज्ञानमार्गाचा वसा घेत जगाला शहाणंसुरतं करणाऱया या अलौकिक सत्पुरुषाने भाद्रपद शुद्ध 12, शके 1837, दि. 20 सप्टेंबर 1915, सोमवारी आपला देह ‘माऊली’स्वरूपात विसर्जित केला.




























































