विश्वविजेत्या कॅरमपटूंचा गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कोरिया येथे झालेल्या पाचव्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत हिंदुस्थानने तब्बल 5 सुवर्ण, 5 रौप्य व 2 कास्यपदकाची कमाई केली. या संघात निम्मा भरणा महाराष्ट्रातील खेळाडूंचा होता. विश्वविजेता प्रशांत मोरे, आयसीएफ चषक विजेता रियाझ अकबर अली व काजल कुमारी तसेच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयेशा मोहम्मद या चौघांनी मिळून एकंदर 4 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कास्यपदकांची लयलूट केली. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने विश्वविजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. तसेच क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या सर्व कॅरम खेळाडूंचे कौतुक करताना भावी काळात कॅरम खेळाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी विनोद तावडे यांना भेटवस्तू म्हणून कॅरमचे घड्याळ व सन 2017-18 सालचा राज्य संघटनेचा वार्षिक अहवाल दिला. यावेळी अरुण केदार व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे मानद् सरचिटणीस यतिन ठाकूर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने या सर्व विजेत्यांचा अध्यक्ष शिवकुमार लाड, कार्याध्यक्ष जितूभाई शाह व उपाध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते वरळी स्पोर्टस् क्लब येथे विशेष सत्कार करण्यात आला.