नोटाबंदीने घातच केला! भाजप खासदाराच्या बँकेलाही आता पटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नोटाबंदीमुळे देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली, बँकिंग सेक्टरला फटका बसला अशी वस्तुस्थिती विरोधकांकडून वारंवार मांडली जात असतानाच आता नगर येथील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनाही हे पटले असून त्यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. नोटाबंदीनेच बँकिंग सेक्टरचा घात केला, असा स्पष्ट आरोप गांधी अध्यक्ष असलेल्या नगर अर्बन बँकेच्या अहवालात केला आहे. दरम्यान, जीएसटीमुळेही बँकिंग व्यवसायावर परिणाम झाला, औद्योगिक प्रगतीला खीळ बसली असेही या अहवालात म्हटले आहे.

नगर अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा 27 सप्टेंबर रोजी नगर येथे होणार आहे. यावेळी बँकेने अहवाल बँकेच्या वेबसाइटवर टाकला आहे. या अहवालामध्ये खासदार गांधी यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्था मंदावली. त्याचा परिणाम देशातल्या बँकिंग व्यवसायावर झाला. त्याचबरोबर देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीला खीळ बसली असून त्याचा परिणाम बँकेच्या कर्जवाढीवर झाला. पर्यायाने कर्जाच्या वसुलीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. तथापि, बँकेने बाकीचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत, असे खासदार गांधी यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. व्यापारीवर्गाला जीएसटीचा फटका बसला आहे. त्यातच भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी जीएसटी व नोटाबंदीचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे, असा आरोप अहवालात करण्यात आला आहे. हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्रातील अलीकडच्या काळातील घडामोडी बँकांमधील मोठय़ा प्रमाणातील घोटाळे यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला अधोगती येण्याचा धोका निर्माण झाला आहे याकडे गांधी यांनी लक्ष वेधले.