
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना थोड़े दिवस आराम देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुख्यमंत्री विश्रांती घेणार असल्याने सरकार सुरळीत चालवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी भाजपने चाचपणी सुरु केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानुसार तीन निरीक्षक रविवारी दुपारी गोव्यात पोहचले असून बैठका सुरू झाल्या आहेत.
पणजीतील हॉटेल फिदाल्गोमध्ये भाजप निरीक्षकांनी सुरुवातीला भाजप आमदारांशी वन टू वन चर्चा करून प्रत्येकाची मते जाणून घेतली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत भाजपच्या सर्व आमदारांनी आपली मते निरीक्षकांकडे मांडली. त्यानंतर गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांनी आपल्यासह पक्षाच्या अन्य 2 मंत्र्यांसोबत सरकारला पाठिंबा देणाऱ्या 3 अपक्ष आमदारांसोबत एकत्रपणे निरीक्षकांची भेट घेऊन आम्हाला तात्पुरता पर्याय नको तर कायम स्वरूपी तोडगा हवा अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर मगो नेते सुदिन ढवळीकर पक्षाच्या एक मंत्री आणि एका आमदारासोबत निरीक्षकांना भेटले. कामकाज सुरळीत राहण्यासाठी सरकारमधील सर्वात वरिष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडे प्रभारी मुख्यमंत्रीपद द्या किंवा महत्वाची खाती द्या अशी मागणी केली. दोन दिवसात सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन निरीक्षकांनी दिले असल्याची माहिती आमदार दीपक पाऊसकर यांनी दिली.
भाजपचे निरीक्षक सोमवारी सकाळी ९.३० वाजता भाजपच्या कोअर कमीटीसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून त्याचा अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना सादर करणार आहे. त्यानंतर शहा मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत. भाजपने ही बैठक संघटनात्मक बांधणीच्या नावाखाली लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निरीक्षकांना भेटून आलेल्या सर्वच आमदारांनी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकारचा कारभार कसा चालवायचा यासाठीच बैठक असल्याचे स्पष्ट केले. भाजपसोबत आघाडीतील घटक पक्षाचे सुर जुळवण्यात निरीक्षक यशस्वी झाले नाही तर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.























































