सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकलमधील हवा खेळती रहावी यासाठी बसविण्यात आलेल्या ‘रूफ माऊंटेड व्हेंटिलेशन सिस्टीम’ला स्वच्छ करण्यासाठी महालक्ष्मी येथील रेल्वेच्या कारखान्यात नवीन डस्ट कलेक्शन सिस्टीम विकसित केली आहे. त्यामुळे धूळ साफ करण्याचे काम सोपे होणार असून लोकलमधील प्रवाशांना खेळती हवा मिळणे सहज शक्य होणार आहे.
उपनगरीय लोकलमध्ये हवा खेळती राहण्यासाठी ब्लोअर्स बसविण्यात आले आहेत. त्यांना रूफ माऊंटेड व्हेंटिलेशन सिस्टीम असे म्हटले जाते. या यंत्रणेत कालांतराने हवेतील धूळ आणि कचरा व प्लॅस्टिकचे कण जाऊन बसतात. त्यांना साफसफाई करताना काढणे हे जिकरीचे काम असते. प्रत्येक लोकलमध्ये असे दोन एअर हॅण्डलिंग युनिट असतात. त्यांची सफाई करताना पूर्वी हातात छोटे पोर्टेबल व्हॅक्युम क्लीनर घेऊन साफसफाई केली जात होती, परंतु या सफाईनंतरही योग्य प्रकारे सफाई केली जात नव्हती असे उघडकीस आले आहे. तसेच सफाईदरम्यान धुलीकण उडून कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि आजबाजूचे पर्यावरणही धोक्यात येत होते. तसेच ही धूळ उडून जाऊन पेंटिंग शॉपमधील नव्याने रंगविण्यात आलेल्या ईएमयू लोकलच्या भिंतीवर चिकटत होती. त्यावर आता नवा उपाय शोधण्यात आला असून या नव्या डस्ट कलेक्शन सिस्टीमचे उद्घाटन पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी स्वच्छता पंधरवड्यानिमित्त शनिवारी, 15 सप्टेंबर रोजी केले आहे.
2200 क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा पंप
महालक्ष्मी कारखान्यात नव्याने विकसित केलेल्या एएचयू डस्ट कलेक्शन सिस्टीममध्ये 2200 क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा शक्तिशाली व्हॅक्युम पंप लावण्यात आला आहे. ज्यात पाच हॉर्स पॉवर, 3 फेज मोटर आणि 100 मि.मी. व्यासाची 150 मीटर लांबीची सक्शन पाइपलाइनचा समावेश आहे. या प्रणालीमुळे एकाच वेळी दोन ते तीन एअर हॅण्डलिंग युनिटची एकाचवेळी साफसफाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे वेळेची प्रचंड बचत होणार आहे.
डस्ट कलेक्शन सिस्टीमचे फायदे
- या प्रणालीमुळे हवेतील प्रदूषण कमी होणार.
- लोकलच्या डब्यातील हवेच्या गुणवत्तेत वाढ.
- कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याची गरज नाही.
- कामाच्या ठिकाणी स्वच्छता राहणार.
- डब्यांच्या पेंटिंगची गुणवत्ता सुधारणार.


























































