मुद्दा : संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> चंद्रकांत पाटणकर  

दादर येथे  मराठी माणसांच्या तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणार्‍या संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालनाचे उद्घाटन 2010 मध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्मृतिदालनात परस्पर समन्वयाच्या अभावामुळे सोमवार ते शुक्रवार खूप कमी पर्यटक भेट देतात, परंतु काही दिवशी शाळा-कॉलेजमधील मोजक्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासगटाच्या भेटीमुळे हे स्मृतिदालन खुलून जाते ही खरोखरीच लक्षणीय बाब म्हणावी लागेल. या स्मृतिदालनाच्या पहिल्या मजल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गडकिल्ल्यांच्या हवाई छायाचित्रणाची सुरेख छायाचित्रे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक क्षणचित्रांची साक्ष देतात. दालनाच्या तळघरात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हिरीरीने भाग घेतलेल्या पन्नासहून अधिक शिलेदारांची तैलचित्रे अंतःकरणाचा ठाव घेतात. तसेच घारापुरी, अजंठा, वेरूळ, जुने क्रॉफर्ड मार्केट, त्या काळचे व्ही. टी. रेल्वे स्थानक, परळ येथील बारादेवीच्या मंदिराबरोबर महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा जपणारी वासुदेव, धनगर, गोंधळी, कीर्तनकार आदींची शिल्पे महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देताना दिसतात.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाबरोबर मुंबई महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की, ज्याप्रमाणे प्रत्येक राज्यातील पर्यटनस्थळामध्ये येणार्‍या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारले जाते त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालनाला भेट देणार्‍या पर्यटकाकडून नाममात्र 10 रुपये प्रवेश शुल्क आकारावे आणि हिंदुस्थानातील इतर भाषिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मराठी भाषेबरोबर इंग्रजी, हिंदी भाषांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र लढ्याची माहिती ध्वनिप्रक्षेपणाद्वारे देण्यात यावी.