
सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान विराजमान झालेत म्हणून पाकिस्तानची धोरणे फार बदलतील अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. कारण आजही पाकिस्तानी सत्तेची सूत्रे अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या लष्कराकडेच असून इम्रान हे त्यांच्या हातचे बाहुले आहेत, त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा कसली करता, असा हल्लाबोल हिंदुस्थानचे परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी केला. पाकिस्तानी सीमांवरून होणाऱया घुसखोरीबाबत सिंग बोलत होते.
इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी झालेल्या निवडीनंतर हिंदुस्थानने ‘वेट ऍण्ड वॉच’ धोरण ठेवलेले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुणीही येवो, पण सत्तेची सूत्रे मात्र लष्कराच्याच हाती असतात हा आजवरचा अनुभव आहे, असे सांगून जनरल व्ही.के. सिंग म्हणाले, इम्रान सरकार सत्तेत आल्यावर सीमांवरील घुसखोरी आणि युद्धबंदी मोडण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. इम्रान लष्कराच्या अंकित राहतात की नाही हा पुढचा प्रश्न आहे. आम्ही नेहमीच मैत्रीसाठी आशावादी आहोत समोरूनही तसाच सकारात्मक प्रतिसाद मिळायला हवा. ‘फिक्की’ने आयोजिलेल्या स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट परिसंवादा वेळी जनरल सिंग यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
आमचे धोरण सकारात्मकच
हिंदुस्थानने इंडो -पाकिस्तान मैत्रीसाठी नेहमीच सकारात्मक धोरण ठेवलेले आहे. उभय देशांतील वाद मिटवण्यासाठी पाकिस्तानने आधी हात पुढे करावा. आम्ही त्यांना नक्कीच उत्तम प्रतिसाद देऊ, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.
संरक्षण मंत्र्यांनीही सुनावले होते खडे बोल
इम्रान खान यांच्या सरकारने आधी पाकिस्तानी सीमेपलीकडून होणाऱया दहशतवादी कारवाया प्रामाणिकपणे रोखाव्यात, मग आम्ही त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चेला तयार होऊ. पाक सरकार दहशतवाद संपविण्याची मानसिकता ठेवणार असेल तरच उभय देशांतील संबंध सुधारतील, असे खडे बोल या आधी हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानला सुनावले होते.
summary-v k singh slams imran khan




























































