मॉल, टॉवरमधील आग रिमोटवरचा फायर रोबोट विझवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robot-fire-extinguisher

सामना प्रतिनिधी । मुंबई

टॉवर, मॉल, मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात लागलेली आग विझवणे अग्निशमन दलाच्या जवानांसाठी जोखमीचे आणि धोकादायक असते. पण आता अग्निशमन दलाने आगीवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित अंतरावरून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने आग विझवण्यास मदत करणाऱया ‘फायर रोबोट’ची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. तो मंजूर झाल्यास पुढील सहा महिन्यांत अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

मुंबईत आता उंचच उंच टॉवर आणि इमारती उभ्या राहिल्या आहेत. अशा टॉवरला आग लागल्यास मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण होतो. आगीची उष्णता व धूर यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना आग विझवताना मोठी अडचण येते व जीव धोक्यात घालून बचवकार्य करावे लागते. अशा वेळी जवान जखमी होतात किंवा बळी पडतात, मात्र अशा फायर रोबोटमुळे या दुर्घटना टाळता येणार आहेत.

कसा आहे फायर रोबोट

हा फायर रोबोट सीआयटीआयसी, आरएक्सआर-एम 80 जेडी नमुन्याचा रोबोट असणार आहे. या रोबोटची ने -आण करण्यासाठी टाटा एस सुपरमिंट बनावटीचे 1 टन वजन उचलण्याची क्षमता असलेले सुसज्ज वाहन खरेदी करण्यात येणार आहे. या वाहनात दोन व्यक्ती बसू शकतील. या रोबोटला वाहनावर चढवणे व उतरवणे यासाठी एक हायड्रोलिक लिफ्ट असणार आहे. कंत्राटदाराने या रोबोटला 24 महिन्यांची हमी दिली असून या रोबोटचे सुटे भाग पुढील 10 वर्षे पुरवणे व 5 वर्षे रोबोटची देखभाल करण्याची हमी दिलेली आहे. मे. श्री ललिता या कंत्राटदाराकडून 91 लाख 72 हजार 800 रुपयांत या रोबोटचा खरेदी करण्यात येणार आहे.

अतिज्वलनशील ठिकाणी उपयोगी

मुंबईत पेट्रोकेमिकल कारखाने किंवा अणुऊर्जा संशोधन केंद्र या ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्यास मोठा धोका आहे. मध्यंतरी चेंबूर येथे बीपीसीएलमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळीही मुंबईकरांच्या पोटात भीतीने गोळा निर्माण झाला होता. गेल्या वर्षी बुचर आयलॅण्ड बेटावर मोठी भीषण आग लागली असता त्यावेळीही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले होते. अशा सगळय़ा अतिज्वलनशील ठिकाणी या रोबोटचा वापर होऊ शकतो.