
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची नावे सध्या चर्चेत आहेत. यामुळे मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदावरून जाणार हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पसंतीनेच त्यांच्या उत्तराधिकाऱयाची निवड होणार आहे.
पर्रीकर गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असल्याने राज्याचा प्रशासकीय कारभार ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीत गोव्याच्या भाजप आमदारांना दिल्लीत पाचारण करून त्यांच्याकडून नेतृत्त्वबदलाचा कल बैठकीत जाणून घेतला. या बैठकीत श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, द. गोवा खासदार नरेंद्र सावईकर, पक्षाचे तीन निरीक्षक उपस्थित होते. सकाळी श्रीपाद नाईक यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचे नाव सर्वात पुढे होते. यामुळे नाईक हे पिछाडीवर गेले. शिवाय भाजपला पाठिंबा देणारे मगोप, गोवा फॉरवर्ड ब्लॉक, राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्षही तेंडुलकर यांच्यासाठी सहमत असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन सीएम दोन दिवसांत
अमित शहा यांनी गोव्याचे सर्व आमदार, गोव्याचे सर्व खासदार आणि तीन पक्ष निरीक्षकांची मते जाणून घेतली आहेत. शहा हे येत्या दोन दिवसांत आपला निर्णय कळविणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले. यामुळे पर्रीकर यांना पर्याय शोधला जात असून गोव्यास नवीन मुख्यमंत्री दोन दिवसांत मिळणार हे स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह गोव्याचे तीन मंत्री रुग्णालयात आहेत. यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या फक्त 10 वर आली आहे. भाजपने आपल्या आमदारांची परेड करून दाखवावी, असे आव्हान गोव्याचे काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी भाजपला दिले आहे.





























































