
सामना प्रतिनिधी । अलिबाग
दरोडेखोर म्हणजे हत्यारांनी वार करून जखमी करणारे, प्रसंगी जीवही घेणारे. रायगड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मात्र दयाळू, कनवाळू आणि प्रामाणिक दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दरोडेखोरांनी कर्जत तालुक्यातील किरवली येथे गेल्या महिन्यात दरोडा घातला होता. परंतु पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसताना त्यांच्यावर झडप घालून तब्बल पावणे सहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.
29 ऑगस्ट रोजी पहाटे किरवली येथील महेश देशमुख यांच्या घरावर सात दरोडेखोरांनी सशस्त्र्ा दरोडा घालून देशमुख कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या घटनेत देशमुख यांच्या पत्नीच्या कपाळाला जखम झाली, हे पाहून एक दरोडेखोर धावतच किचनमध्ये गेला आणि त्याने हळद आणून तिचा लेप देशमुखांच्या पत्नीच्या कपाळावर लावला. यानंतर दरोडेखोरांनी सर्वांना बांधून दागदागिने व रोकड मिळून 6 लाख 28 हजारांचा ऐवज लुटला. एका दरोडेखोराच्या हाताला देशमुख यांच्या बँकेचे एटीएम कार्ड लागले. त्यांनी देशमुख यांना दरडावून पासवर्ड विचारला. तो कळताच दरोडेखोरांनी देशमुख यांच्याकडून त्यांच्या कारची चावी घेतली. घराबाहेर उभी असलेली कार घेऊन दरोडेखोर एटीएम सेंटरवर गेले. तेथून त्यांनी एटीएममधून कॅश काढली. कार पुन्हा देशमुख यांच्या घरी आणून उभी केली आणि त्यानंतर त्यांनी पोबारा केला. दरोडेखोरांच्या प्रामाणिकपणामुळे पोलीसही चक्रावले.
रिक्षामुळे लागला माग
कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकूल यांनी हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. दरोडेखोरांनी रिक्षाचा वापर केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी खबऱयामार्फत रिक्षाच्या मालकाचा शोध घेतला आणि त्यानंतर ते दरोडेखोरांपर्यंत पोहोचले. या घटनेत एक खबरी, दोन दरोडेखोर आणि दोन सराफ यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.






























































