
सामना प्रतिनिधी । माजलगाव
निजामकालीन महत्व व नवसाला पावतो अशी ख्याती असलेल्या येथील टेंबे गणपतीची गुरुवारी भाद्रपद एकादशीला जल्लोषात स्थापना मिरवणूक काढण्यात आली. 118 वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडून सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रेरणा घेऊन येथील ब्राह्मणांनी गणपतीची स्थापना केली. त्यावेळी निझाम राजवट असल्याने गणपती स्थापनेची परवानगी हैद्राबाद येथून आणावी लागत असे, अशी आख्यायिका या गणपतीच्या स्थापनेमागे असल्याचे सांगण्यात आले.
टेंबे गणपतीची गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता सजवलेल्या ट्रॅक्टरमधून स्थापना मिरवणूक काढण्यात आली. मोरया -मोरयाच्या जयघोषात मिरवणूक मठगल्ली, मस्जिद चौक मार्गे झेंडाचौकहून श्रीराम मंदिरात आली. तेथे मंत्र्त्रोचारात गणपतीची स्थापना करण्यात आली. सहा फुटी सिंहासनावर आरूढ असलेल्या गणपतीची मुर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. प्रत्येक घराघरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढून गणपतीचे स्वागत करण्यात आले. महिला भाविकांनी गणपतीला आरती ओवाळून मनोभावे पूजा केली. मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी, सुरेंद्र जोशी, बंडूदेवा जोशी, कल्याण नरवाडकर यांच्यासह भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

































































