
सामना ऑनलाईन । श्रीनगर
सीमेवर आणि कश्मीर खोऱ्यात भयंकर रक्तपाताचे सत्र सुरूच असून कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी तीन पोलिसांचे अपहरण करून आज हत्या केली. तसेच तीन दिवसांत पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा द्या, नाहीतर गोळय़ा घालू, अशी जाहीर धमकीच ‘हिजबुल’ने दिल्यानंतर किमान सहा ‘एसपीओं’नी राजीनामा दिला आहे. दरम्यान, कश्मीर खोऱ्यात प्रचंड दहशत असून तणाव वाढला आहे. नियोजित पंचायत निवडणुका उधळून लावण्याची धमकीही दहशतवाद्यांनी दिली आहे.
सीमेवर पाकिस्तानी सैन्य आणि कश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले यामुळे चार दिवसांत दोन भयंकर हत्याकांडे घडली आहेत. मंगळवारी पाकड्यांनी बीएसएफचे जवान नरेंदर कुमार सिंह यांचे शिर छाटले, डोळे काढले.
30 ऑगस्टला पोलिसांच्या नातेवाईकांचे केले होते अपहरण
हिजबुल मुजाहिद्दीनने जम्मू-कश्मीर पोलिसांनाच टार्गेट केले आहे. 30 ऑगस्टला पोलिसांच्या आठ नातेवाईकांचे अपहरण केले होते. नंतर त्यांना सोडून दिले होते. आज तीन पोलिसांची गोळय़ा घालून हत्या केली. हिजबुल मुजाहिद्दीनचा कश्मीर खोऱयातील कमांडर रियाज नाइकू हा भयंकर रक्तपाताचा सूत्रधार आहे. रियाज नाइकूने जम्मू-कश्मीर पोलीस दलातील ‘एसपीओं’ना टार्गेट केले आहे. त्यासाठी नाइकूचा 12 मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाला आहे.
‘हिजबुल’ कमांडर रियाज नाइकूचा धमकीचा व्हिडीओ
दहशतवादी लपल्याची माहिती ‘एसपीओं’कडून पोलिसांना दिली जाते. यापुढे पोलीस दलात नोकरी करू नका तीन दिवसांत राजीनामा द्या नाहीतर गोळ्या घालून ठार करू, अशी धमकीच नाइकूने दिली आहे. राजीनामा दिल्याची घोषणा पहिल्यांदा मशिदीत जाऊन करा. त्यानंतर राजीनामा दिल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ फेसबुक, ट्विटरवर अपलोड करा असे नाइकूने धमकी देताना म्हटले आहे.
तीन पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. गुरुवारी दोन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर आज पुन्हा तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात हिंदुस्थानी लष्कराला यश आले आहे. दोन दिवसांत ठार करण्यात आलेले पाचही दहशतवादी हे ‘लश्कर-ए-तोयबा’चे दहशतवादी आहेत.
बटागुंड आणि कापरान गावात हिजबुलचे दहशतवादी घुसले आणि चार पोलिसांचे अपहरण केले. यावेळी गावकऱ्यांनी विरोध करताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. नदी पार करून कॉन्स्टेबल निस्सार अहमद आणि पोलीस दलातील दोन एसपीओ (स्पेशल पोलीस ऑफिसर) फिरदोस अहमद आणि कुलवंत सिंग यांची हत्या केली. एका पोलिसाला सोडून दिले.
पोलीस दलाचा कणा मोडणार
जम्मू-कश्मीर पोलीस दलामध्ये स्पेशल पोलीस ऑफिसर अर्थात ‘एसपीओं’ला विशेष महत्त्व आहे. एसपीओंची नियुक्ती स्थानिक तरुणांमधून केली जाते. अवघा सहा हजार रुपये पगार असणारे ‘एसपीओ’ हे पोलीस दलाचा कणा आहेत.
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्याची खबर सर्वांत आधी एसपीओकडून पोलिसांना दिली जाते. गुप्तचराचे काम हे एसपीओ करतात, पण हिजबुलच्या धमकीमुळे आतापर्यंत किमान सहा ‘एसपीओं’नी राजीनामा दिल्यामुळे पोलीस दलास हादरा बसला आहे. इर्शाद अहमद बाबा, तजाला हुसेन लोण या एसपीओंनी नोकरीचा राजीनामा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ झळकला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने केला इन्कार
‘हिजबुल’च्या धमकीनंतर कश्मीर खोऱ्यातील काही एसपीओ आणि पोलिसांनी राजीनामा दिल्याचे वृत्त केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळले आहे. कोणीही राजीनामा दिलेला नाही. काही मीडियाकडून चुकीचे वृत्त दिले जात असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.
summary- three cops got kidnapped and killed in kashmir




























































