
सामना ऑनलाईन, मुंबई
हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ झालेला असला तरी अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाहीत. या पुलाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी व अभियांत्रिकी सेवा पुरवण्यासाठी समन्वयक नेमण्याची शिफारस मध्य रेल्वेने पालिकेला केली आहे. रेल्वेने सुचवलेल्या कंपनीला समन्वयक नेमण्यास स्थायी समितीने आज मंजुरी दिली असून त्यामुळे पुलाचा बांधकाम खर्च 1 कोटी 80 लाखांनी वाढला आहे.
माझगाव येथील शिवदास चापसी रोड येथील हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचे काम बऱ्याच अडचणीनंतर सुरू झाले आहे, मात्र रेल्वेने पालिकेकडे नवीनच शिफारस केली आहे. रेल्वेच्या हद्दीतील जो पुलाचा भाग आहे त्याच्या कामाची देखरेख करण्यासाठी व आवश्यक आभियांत्रिकी सेवा पुरवण्यासाठी कंत्राटदार नेमण्याची शिफारस रेल्वे प्रशासनाने पालिकेकडे केली आहे. त्याकरिता मे. राईटस् लि. किंवा मे. इरकॉन इंटरनॅशनल लि. या दोन कंपन्यांची नावेही सुचवली आहेत. त्यापैकी राईटस् या कंपनीने सहमती दर्शवली आहे.
1 कोटी 80 लाखांचे शुल्क
या कामासाठी राईटस् या कंपनीने 1 कोटी 80 लाखांचे शुल्क मागितले आहे. राईटस् ही कंपनी केंद्र सरकारची आहे. देखरेखीच्या कामासाठी दरमहा 10 लाख रुपये असे वर्षभराचे 120 लाख व स्टील गर्डर फॅब्रिकेशनच्या कामाची देखरेख करण्यासाठी 60 लाख रुपये शुल्क करण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी साई प्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली असून त्यांना सल्लागार सेवेसह 51.70 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.

























































