
सामना प्रतिनिधी, मुंबई
महागाई, न्यायालयाची बंधने, परवानग्या अशी अनेक विघ्नं पार करीत गेल्या 11 दिवसांपासून भक्तांच्या घराघरात आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये विराजमान झालेल्या गणेशमूर्तींचे उद्या, रविवारी वाजतगाजत विसर्जन होणार आहे. जड अंतकरणाने, भरल्या डोळय़ांनी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त दरवर्षीप्रमाणे गणरायाला निरोप देतील. गणरायाकडे दुसरं काहीही मागणं न मागता ‘हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा…’ हे एकच मागणे गणेशभक्त मनातल्या मनात मागत असतात आणि म्हणूनच पुढच्या वर्षी लवकर येण्याचा आग्रह निरोपाच्यावेळी सुरू असतो. गणरायाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबई सज्ज झाली आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनांसहित मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोइंग वाहने, क्रेन्स, जेसीबी मशीन्स, बुलडोझर इत्यादी यंत्रसामुग्रीदेखील तैनात करण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था
सर्व सार्वजनिक गणपती विशेषतः मोठय़ा उंचीच्या मूर्तींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होत असते. त्यामुळे या परिसरात लाखो भाविक मिरवणुका आणि गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी जमत असल्यामुळे या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाटीवर जाण्यासाठी असलेले प्रवेशद्वार यंदा रुंद करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी व्हीआयपी व्यक्तीही श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी शामियाना उभारण्यात आला आहे.
दादर टीटीसर्कलमध्ये ‘पुष्पवृष्टी सोहळा’
गणरायाला निरोप देण्यासाठी रस्ते गणेशभक्तांनी आणि मिरवणूकांनी उद्या फुलून जाणार असून दादर टीटी सर्पलमध्ये दरवर्षीप्रमाणे पुष्पवृष्टी सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. श्रींच्या मुर्तींवर पुष्पवृष्टी करण्याची प्रथा सर्वप्रथम सुरू करणाऱया दादर टीटी सहकारी विप्रेता संघाच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गणेशभक्तांना लिंबू सरबत, प्रथमोपचार केंद्र, तसेच दक्षतापथकाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहनभाई निखारंगे आणि संयोजक दत्ता घाटकर यांनी कळवले आहे.
-खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नका.
-भरती व ओहोटीच्या वेळा समजून घ्या.
-गणेशमूर्ती विसर्जनाकरिता शक्यतो तराफे, महापालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.
-अंधार असणाऱया ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरिता जाऊ नका.
-मोठय़ा गणेशमूर्तींबरोबर प्रत्यक्ष विसर्जनाकरिता समुद्रात जाणाऱया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिरगणती करून जावे.
-महापालिकेने पोहण्याकरिता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाऊ नका.
-समुद्रात-तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित त्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना, पोलिसांना, जीवरक्षकांना द्या.
-गणेशभक्तांनी मूर्तींचे विसर्जन करतेवेळी पाण्यात गमबूट घालावेत.
-मद्यप्राशन करून समुद्रकिनाऱयावर विसर्जनस्थळी जाऊ नये. कारण अशा व्यक्तीवर मत्स्यदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.
मत्स्यदंश झाल्यास
समुद्रातून बाहेर आल्यावर आपणास मत्स्यदंश झाल्याचे जाणवल्यास तत्काळ सदर जागा स्वच्छ पाण्याने धुवावी अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावावा.
माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्वच्छ कपडय़ाने किंवा हाताने दाबून धरावे जेणेकरून जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही.
माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्वच्छ कपडय़ाने किंवा हाताने दाबून धरावे जेणेकरून जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही.
महापालिका इन ऍक्शन
गणपती विसर्जनासाठी पालिकेने सर्व चौपाटय़ा, तलाव आणि विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था केली आहे. अधिकारी, कर्मचारी, जीवरक्षक अशी तब्बल 9000 मनुष्यबळाची फौज यानिमित्ताने रस्त्यांवर उतरणार असून एकूण 69 विसर्जन स्थळांवर पालिकेने चोख व्यवस्था केली आहे. गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर उपनगरातून, ठाणे जिह्यातून तसेच परदेशातून पर्यटक येत असतात. अशा वेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी कृत्रिम आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जीवरक्षक, मोटरबोट, जर्मन तराफा आदी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.
summary- mumbai ready for ganesh visarjan



























































