फिल्मी स्टाइल पलायन! कचऱ्याच्या गाडीतून कैद्याने केला पोबारा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुरुग्राम येथील भोंडसी तुरुंगातून एका कैद्याने पलायन केल्याने जेलच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी कैद्यांची मोजणी केली असता एका कैद्याने पलायन केल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तुरुंगात कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या गाडीत लपून एका कैद्याने पलायन केल्याचे लक्षात आले. सात दिवसांपूर्वीच या कैद्याला या तुरुंगात आणण्यात आले होते. तुरुंग अधिकाऱ्यांना गुंगारा देत फिल्मी स्टाइलने कैद्याने केलेल्या पलायनामुळे तुरुंग प्रशासनावर टीका होत आहे. या प्रकरणी चार कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला भोंडसी येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. आठवड्याभरापूर्वीच 15 सप्टेंबरला त्याला या तुरुंगात आणण्यात आले होते. त्याला बराक क्रमांक तीनमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी कैद्यांची मोजणी करताना एक कैदी कमी असल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दुपारी सव्वा वाजता तरुंगात कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या गाडीत लपून हा कैद्याचे पोबारा केल्याचे दिसून आले. दुपारी कैद्याने पोबारा करूनही संध्याकाळी कैद्यांची मोजणी होईपर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

बराक तीनचे प्रभारी कुलदीप सिंह, मुख्य वॉर्डर आझाद सिंह, वॉर्डर राहदास, नादान सिंह आणि कचऱ्याच्या गाडीवर तैनात असलेले कर्मचारी वेदप्रकाश आणि ओमपाल यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याच तुरुंगात गेल्यावर्षी भूयार खोदून पलायन करण्याचा प्रयत्न कैद्यांनी केला होता. त्यांच्याकडे खोदण्याची हत्यारे आली कोठून असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाला कैद्यांच्या योजनेची माहिती मिळाल्याने कैद्यांचा कट फसला होता.