
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड जिल्ह्यात डेंग्यू फोफावला असून शहरासह पंधरा तालुक्यात 402 रुग्णाच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. तब्बल 114 डेंगीचे रुग्ण आढळले असून यात नांदेड शहरातील 30 जणांना गेल्या काही महिन्यांत याची लागण झाल्याचे निदर्शनास आले.
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील धर्माबाद तालुका वगळता इतर १५ तालुक्यातील तालुकानिहाय ४०२ संशयित डेंगीच्या आजारी रुग्णांच्या रक्ताची विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. या पैकी ११४ जणांना डेंगीची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. वर्षापूर्वी जिल्ह्यात डेंगी च्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७४ इतकी होती.या वर्षात डेंगीच्या आजारात झपाट्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
नांदेड शहरवासीयांना महापालिकेकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा येतो. त्याचा तुटवडा भासू नये म्हणून शहरातील बहुतेक नागरिक जास्तीचे व अनावश्यक पाणी साठवून ठेवणल्यामुळे महापालिका क्षेत्रात डेंगी की जास्त लागवड लागण झाल्याची शक्यता तज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते. तर घरांमध्ये जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये. रांजण व पाण्याची टाकी उघडी ठेवू नये. एक दिवस तरी भांडी कोरडी करून भरावे. कुलर डेझर्ट कोरडे करावेत आणि रात्री झोपताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.























































