सामना ऑनलाईन । रायगड
निसर्ग सौदर्यानं नटलेला परिसर आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या देवकुंड परिसरातील धबधब्यात ३ पर्यटक बुडाले. सिंग रावत (वय २२), विश्वजीत कुमार आणि राजेंद्र सिंग लांबा (वय २०) अशी धबधब्यात बुडाल्यांची नावे आहेत. तर, संकल्प निखिलेश निगम (वय २२) सोमेश अक्कल स्वामी दोडा (वय २२) हे दोन जण या घटनेत वाचले आहेत.
रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून या धाब्यावर पर्यटकांची गर्दी सुरू झाली होती. दुपारी पुणे येथून आलेल्या पाच जणांनी स्थानिक प्रशासनाने बसविलेल्या चौकीवर हुज्जत घातली आणि धबधब्याकडे गेले. साडेतीन चारच्या सुमारास हे पाच पर्यटक धबधब्यावर पोहचले असल्याची माहिती मिळते. धबधब्याच्या कुंडातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे पाचही जण बुडू लागले. यापैकी दोन जण कसेबसे बाहेर येण्यात यशस्वी झाले. मात्र तीन जण धबधब्याच्या कुंडात बुडाले असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बुडालेल्या पर्यटकांचा तपास सुरू करण्यात आला आहे.






























































