
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
गणपतीपुळे येथील जीवरक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे सांगलीतील एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. गणपुतीपुळे येथे फिरण्यासाठी आलेला हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहताच किनाऱ्यावर उभे असलेल्या जीवरक्षकांनी समुद्रात उड्या मारून तरुणाला सुखरुप बाहेर काढले. राघवेंद्र सुतार ( २६) असे त्याचे नाव आहे.
राघवेंद्र सांगलीतील कुपवाड येथील रहीवासी आहे. तो सोमवारी गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता. दुपारी दिडच्या सुमारास तो पोहण्यासाठी समुद्रात गेला होता. पण आपण बुडत असल्याचे लक्षात येताच त्याने मदतीसाठी आरडोओरडा केला. ते ऐकून जीवरक्षक ओंकार गावणकर , अनिकेत राजवाडकर,मिलिंद माने, विशाल निंबरे, रोहीत चव्हाण, अक्षय माने, अनिकेत चव्हाण यांनी समुद्रात उड्या मारल्या व राघवेंद्रचे प्राण वाचवले.






























































