नगर शहरात शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराची सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शिवसेनेच्या माध्यमातून वंचितांना, गोरगरीबांना व तळागाळातील लोकांना इतर सुविधांप्रमाणे आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शिवसेना अग्रेसर असते. समाजाच्या सर्व गरजा या विकासाच्या माध्यमातून सोडविणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शहराबरोबरच उपनगराच्या विकासासाठी शिवसेनेने कधीही दुजाभाव केला नाही. इतर पक्षांनी स्वतःच्या फायद्यासाठीच उपनगरांचा वापर करून घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत इतर पक्षांनी नगरचे नाव बदनाम केले आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. शिवसेनेच्यावतीने व लोककल्याण आरोग्य केंद्र, मुंबई-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील विविध भागांमध्ये 25 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आरोग्य चिकित्सा, नेत्र परीक्षण, चष्मा व औषध वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त मंदिर, शास्त्रीनगर, केडगाव येथे या शिबिराची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या शिबिरावेळी महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, हर्षवर्धन कोतकर, संजय लोंढे, रमेश परतानी, रावसाहेब भाकरे, डॉ. श्रीकांत चेमटे, विजय पठारे, मुकेश गावडे, संग्राम शेळके, सोपान कारखिले, अमोल येवले, प्रमोद ठुबे, संग्राम कोतकर, डॉ. राजेंद्र थोरात, संतोष डमाळे, अंगद महारनवर, सुनील सातपुते, पप्पू भाले आदी उपस्थित होते. अनिल राठोड म्हणाले की, आधी केले मग सांगितले ही शिवसेनेची काम करण्याची पद्धत आहे. शिवसेनेची नक्कल करण्यापेक्षा प्रेरणा घ्या. प्रेरणा घेतल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू. आम्ही नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिले आहे.

महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, विकासकामांबाबत कधीही तडजोड केली नाही. नागरी वसाहतींत ज्या ठिकाणी समस्या भेडसावत आहेत, त्या ठिकाणच्या समस्यांचा निपटारा करण्यात आला. दर्जेदार सुविधांबरोबरच नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, डोळे हेच विश्‍व आहे, त्यासाठी समाजातील गोरगरीब, वंचित व गरजवंतांना डोळ्यांच्या आजारांच्या निवारणासाठी सलग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, शिवसेना हा सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. शास्त्रीनगर भागातील प्रलंबित समस्या सोडविल्या आहेत. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय इतरांना घेण्यात काय आनंद वाटतो, तेच कळत नाही. शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही शिबिरांचे आयोजन केले आहे. केडगावच्या वाढीव वसाहतीत 1 कोटी रुपयांची कामे लवकरच सुरू होतील. केडगावचा पाणीप्रश्‍न आता कायमचा सुटणार आहे, असे ते म्हणाले. संभाजी कदम, अनिल शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन रावसाहेब भाकरे यांनी केले. रमेश परतानी यांनी आभार मानले.