
सामना प्रतिनिधी । तुमसर (भंडारा)
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले इंधन दरवाढीचे सत्र कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने तुमसर शहरात पेट्रोल ९०.७८ रुपये तर डिझेल ७८.०५ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
गेल्या महिन्याभरात जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांचे वाढलेले दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यातील मोठय़ा घसरणीमुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. सर्वसामान्यांना होरपळून काढणार्या इंधन दर भडक्यामुळे सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली जात आहे.
सर्वसामान्य माणसाने एका महिन्याचे बजेट निश्चित केलेले असते. प्रत्येक माणसाचे घरगुती बजेट हे तुटीचेच असते. आता पेट्रोल व डिझेलने या तुटीच्या बजेटमध्ये आणखी तूट वाढविली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाल्याने महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रीया आहेत.



























































