…छान आठवणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिमा लागू. एक सुंदर संपन्न चेहरा ‘show must go on’ या तत्त्वावर त्यांची भूमिका असलेला होम स्वीट होम चित्रपट येतो आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांनी रिमाताईंसोबत काम केल्याचे अनुभव मांडले आहेत.

‘होम स्वीट होम’ या चित्रपटानिमित्त मी पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत आनंददायी, बरेच काही माणूस म्हणून शिकवणारा होता. नवीन लोकांसोबत काम करावे लागते. त्यांच्यासोबत जुळवून घेत घेत प्रत्येकाचे स्वभाव भिन्न, मनोवृत्ती, संयमाची पराकाष्ठा अनुभवता येते. माणूस म्हणून घडण्यासाठी दिग्दर्शन हे एक उत्तम शिक्षण आहे. लेखक म्हणून मी कथा, पटकथा, संवाद यावर काम केलेले आहे आणि करतच आलेलो आहे. नट म्हणून इतकी वर्षे काम करतोच आहे. पण दिग्दर्शनाचा अनुभव पहिलाच होता, पण लेखक आणि अभिनेत्यापेक्षा मला दिग्दर्शन जास्त भावले. त्याचा चस्का जरा जास्त आहे. चित्रपटाची कथा मी, वैभव जोशी आणि मुग्धा गोडबोले आम्ही तिघांनी मिळून लिहिली आहे.

 ‘होम स्वीट होम’ चित्रपटात रिमा लागू यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिमच होता. एक तर याआधी आम्ही एकत्र काम करू शकलो नव्हतो. पण त्यांनी माझं काम पाहिलं होतं. त्यांना माझे लेखन आवडायचे, त्यामुळे त्या भेटल्यावर नेहमी सांगायच्या तू फार उत्तम लिहितोस, माझ्यासाठी कधीतरी लिही. त्यानंतर मग पार्टी, इव्हेंट्समध्ये भेटून गप्पागोष्टी करायचो. पण ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाची जेव्हा प्रत्यक्षात गोष्ट लिहायला घेतली तेव्हा माझ्यासमोर शामल महाजन या भूमिकेत फक्त रिमाताई उभ्या राहिल्या. लेखकाच्या मनात भीती असते आपण लिहिलेल्या भूमिकेला कलाकार योग्य न्याय देऊ शकेल की नाही त्याची. पण मी रिमाताईंना भेटलो, तेव्हा त्यांना कथा वाचून दाखवली. निम्मी कथा ऐकल्यावरच त्यांनी मला थांबवलं आणि हा सिनेमा मी एका पायावर करायला तयार आहे आणि करणार आहे. मला खूप आवडला आहे. पुढची गोष्ट मी निवांत ऐकणार आहे. त्यांनी अगदी कुठलेही आढेवेढे न घेता गप्पा मारत बसल्या. पुढे त्यांच्यासोबत काम करताना त्यांची प्रत्यक्ष कामातील शिस्त, कामाबद्दलचे प्रेम, आत्मीयता हे अनुभवता आले. त्यांचा कामाचा आजवरचा अनुभव माझ्यापेक्षा फार जास्त होता, तरीही त्याचे कुठलेही दडपण त्यांनी माझ्यावर येऊ दिले नाही. मला अपेक्षित असलेल्या भूमिकेला त्यांनी न्याय दिला आहे. या चित्रपटाकडून त्यांच्या बऱयाच अपेक्षा होत्या. त्या खूप आनंदी आणि समाधानी होत्या.

त्यांनी भूमिकेला न्याय दिला

शामल महाजन असे रिमाताईंच्या भूमिकेचे नाव आहे. साठी पार केलेले हे जोडपे आहे. पस्तीस वर्षे शहरातल्या मध्यवर्ती भागात चौथ्या मजल्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. घर घेतानाची जी स्वप्नं असतात त्या स्वप्नांपासून सुरू झालेला प्रवास आता वाढत्या वयामध्ये, त्याच जागेमध्ये. नक्की नवरा-बायकोमध्ये असलेल्या जागेबद्दल काय मते झालेली आहेत आणि दृष्टिकोन कसे दोघांचे वेगळे आहेत. कर्तव्यदक्ष गृहिणीची आणि मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरामध्ये घरची लक्ष्मी कशी असते अशी ती भूमिका आहे. पण घरामध्ये पेइंग गेस्ट राहणारी मुलगी, सतत घरात येणारा फॅमिली मेंबरसारखाच असणारा इस्टेट एजंट आणि मोलकरीण अशी मजेदार पात्रं आहेत. तर एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून आणि एक आई म्हणून काय काय नक्की धागेदोरे असतात, पदर असतात ते रिमाताईंनी इथे अप्रतिम साकारले आहे.

त्या मला मित्र मानायच्या

मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांना कथा वाचून दाखवायची भीती वाटली होती. पण कथा अर्ध्यावर आली असताना त्या अत्यंत आनंदाने जेव्हा म्हणाल्या आता स्क्रिप्ट बाजूला ठेवा आपण गप्पा मारूया. मला कथा भयंकर आवडलेली आहे. मी आता शांतपणे संपूर्ण कथा वाचेन, पण या सिनेमात मी काम करणार आहे, तू मला तारखा सांग. माझ्यासारख्या पहिलं दिग्दर्शन करणाऱया दिग्दर्शकासाठी ते शब्द फार महत्त्वाचे होते. तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. प्रत्यक्षात सेटवर आम्ही खूप चांगले मित्रमैत्रीण होतो. म्हणजे माझ्यापेक्षा त्या वयाने खूप मोठ्या असल्या तरी माणूस म्हणून त्या खूप चांगल्या होत्या. काही वेळा हक्काने रुसायच्या आणि मला त्यांची मनधरणी करायला लागायची. वय विसरून समवयस्कसारखी चेष्टा, मस्करी, हसणं, खिदळणं त्यांचे चालायचे. मुख्य म्हणजे आयुष्याबद्दल त्यांनी माणूस म्हणून जे काही शेअर केलं ते माझ्यासाठी महत्त्वाचे क्षण होते. कारण आपण व्यक्ती म्हणून सगळ्यांशी बोलतो पण आपलं अंतर्मन काहीजणांपुढेच व्यक्त करतो. गप्पा अनेकांसोबत मारतो, मस्ती अनेकांसोबत करतो पण मनातल्या कप्प्यातल्या गोष्टी काहीजणांनाच आपण सांगतो. आमची खूप चांगली मैत्री होती. माझं जितकं वय आहे तितकी वर्ष त्यांची कारकीर्द, असे असताना त्या मला मित्र मानायच्या ही माझ्यासाठी फारच संस्मरणीय गोष्ट आहे.