
सामना प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या वर्चस्वालाच धक्का लावण्याचा निर्णय आज राज्य सहकारी बँकेच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सहकारी बँकेत याआधी मध्यवर्ती बँकेच्या 12 संचालकांचे प्रतिनिधित्व असे ही संख्या आता सात करण्याचा निर्णय आज बँक प्रशासकांनी घेतला. या निर्णयामुळे संचालक मंडळातील जिल्हा बँकेच्या एकाधिकारशाहीला धक्का बसला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची 107 की वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. राज्य बँकेच्या संचालक मंडळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी म्हणून पूर्वी 12 संचालकांचा समावेश होता. संचालक मंडळात जिल्हा बँकांचे वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून संचालकांची संख्या 12 वरून 7 इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका विशिष्ट मतदारसंघाला 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाव दिल्यास त्यांची एकाधिकारशाही निर्माण होते. त्यामुळे जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व कमी करण्यात आले. जिल्हा बँकेच्या सात संचालकांपैकी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ संचालक असेल. उर्वरित सहा संचालक हे राज्याच्या सहा महसूल विभागातून निवडून येतील, असे अनास्कर यांनी सांगितले.
सहकारी पतसंस्था, सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही प्रतिनिधित्व देऊन संचालक मंडळात सामावून घेण्यात येणार आहे. दोन तज्ज्ञ संचालकांचीही नेमणूक करण्यात येणार असून निवडणूक लढवणारे तज्ज्ञ संचालक हे रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे निकष पूर्ण करणारे असतील, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले. संचालकांची संख्या कमी-जास्त करण्यात आली असली तरी एकूण संचालक मंडळ हे 21 जणांचे असेल. त्यात राखीव मतदारसंघातून निवडून येणाऱ्या संचालकांचा समावेश असेल असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व कमी करताना राज्य बँकेने साखर कारखाना, सूतगिरण्या, नागरी बँकांचे प्रतिनिधित्व वाढवले आहे. याआधी बँकेच्या संचालक मंडळात सूतगिरण्या आणि साखर कारखाना गटातून एकाला प्रतिनिधित्व मिळत होते. आता ही संख्या दोन करण्यात आली आहे. नागरी बँकेमधून येणाऱ्या संचालकांची संख्या दुप्पट म्हणजे दोनवरून चार इतकी करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
summary- setback for district banks in cooperative banking sector



























































